आठ कृषी केंद्रांवर कारवाई

0
10

गोंदिया : खरीप हंगामाच्या तयारीत लागलेल्या बळीराजाची फसवणूक होऊ नये आणि शेतकऱ्यांना लागणाऱ्या बी-बियाण्यांची विक्री नियमानुसार व्हावी यासाठी कृषी विभागाकडून कृषी केंद्रांची तपासणी सुरू आहे. त्यात आतापर्यंत ८४ केंद्रांची तपासणी भरारी पथकाने केली असून त्यापैकी ८ केंद्रांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडे नियमबाह्यपणे ठेवलेले १३ लाख ८४ हजार रुपयांचे बियाणे विक्रीबंद करण्याचे आदेश देण्यात आले.

कृषी केंद्रांकडे साठा पुस्तक नसणे, दरफलक न लावणे, विक्री परवान्यात विक्री करीत असलेल्या कंपन्यांच्या बियाण्यांचा समावेश नसणे अशा विविध कारणांसाठी गोंदिया, तिरोडा, अर्जुनी मोरगाव, सालेकसा आणि आमगाव तालुक्यातील ८ केंद्रांवर ही कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडील ९५० क्विंटल धानाचे बियाणे विक्री करण्यास बंदी घालण्यात आली. याशिवाय ६ कृषी केंद्रांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. ही कृषी केंद्र बंद होते. त्यामुळे त्यांना नोटीस बजावण्यात आली.