मुंबई:-शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल उद्या लागणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर बुधवारी ४ वाजता निकाल जाहीर करतील. अशातच आमदार अपात्रतेच्या निकालाआधीच ठाकरे गटाला दोन मोठे धक्के बसले आहेत.
आज सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास शिवसेना ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरावर ईडीने धाड टाकली आहे. जोगेश्वरी येथील भूखंड गैरवापर प्रकरणी ईडीने वायकर यांच्या ७ ठिकाणांवर ही छापेमारी केल्याची माहिती आहे. त्यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार राजन विचारेंच्या घरांवर आयकर विभागाने छापा टाकला आहे.
ठाकरे गटाचे खासदार राजन विचारेंच्या घरावर आयकर विभागाचा छापा टाकल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. आमदार रवींद्र वायकरांनंतर आता खासदार राजन विचारे टार्गेटवर असल्याची त्याचबरोबर तपास संस्थांकडून आज ठाकरे गट निशाण्यावर असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.
प्रकरण नेमकं काय?
रवींद्र वायकर यांच्या विरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केला होता. जोगेश्वरी येथील हॉटेल संदर्भात ही तक्रार होती. मुंबई महापालिकेच्या राखिव भूखंडावर वायकर यांनी पंचतारांकित हॉटेल बांधली आहे. त्याची परवानगी वायकर यांनी पालिकेकडून घेतली नव्हती. हा सुमारे ५०० कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा दावा सोमय्या यांनी त्यांच्या तक्रारीत केला होता. आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे ही तक्रार करण्यात आली होती. त्याची गंभीर दखल घेऊन आर्थिक गुन्हे शाखेनं वायकर यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. वायकर चौकशीला उपस्थित राहिले होते. त्यानंतर आता वायकरांच्या अडचणीत वाढ झाली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे