‘वाघाची शेळी कशी झाली हो?’-नितेश राणे

0
5

नागपूर – कणकवलीचे काँग्रेसचे तरुण आमदार नितेश राणे यांनी आज विधानसभेत दुष्काळाच्या चर्चेत भाग घेताना पहिल्याच भाषणाने सभागृहाचे नुसते लक्ष वेधून घेतले नाही, तर अतिशय मोजक्या शब्दांतील भाषणामुळे सभागृहाने बाके वाजवून त्यांना मनापासून दाद दिली.

विधानसभेत नियम २९३ अन्वये सुरू असलेल्या चर्चेत भाग घेताना पहिल्याच भाषणात नितेश राणे यांनी त्यावेळच्या विरोधी पक्षाच्या बाकांवर बसलेल्या सुधीर मुनगंट्टीवार यांनी आमच्या सरकारला ‘कासवछाप’ सरकार म्हटले होते. त्यांचे मागच्या वर्षीचे भाषण माझ्या हातात आहे. त्यावेळी तुम्ही कासवछाप म्हणालात, आता तुमच्या सरकारला गती का नाही, शिवाय तुमच्याबरोबर वाघ आल्यानंतर त्या वाघाची शेळी झाली आहे, असा सणसणीत टोला नितेश राणे यांनी लगावला.

ते आपल्या भाषणात म्हणाले की, ‘महाराष्ट्रावर दुष्काळाचे प्रचंड सावट आहे. अशा परिस्थितीत सर्वानी शेतक-यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे. आता जे सत्ताधारी बाकांवर आहेत त्यांची पूर्वीची भाषणे मी वाचली. गेल्या वर्षी याच सभागृहात बोलताना सध्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले होते, ‘आघाडी सरकारची गती कासवासारखी आहे. हे सरकार कासवछाप आहे.’ आज भाजपाचे सरकार येऊन दोन महिने झाले. रोज आत्महत्या होत आहेत. तरी सरकारच्या मदतीचा वेग वाढत नाही. आता त्यांच्यासोबत स्वत:ला वाघ म्हणवून घेणारी शिवसेनाही त्यांच्यासोबत आहे, तरी सरकारची गती का वाढत नाही? सरकारची गती मंद झाली असताना शिवसेना थंड कशी? शिवसेनेच्या वाघाची शेळी झाली आहे काय, असा सवाल काँग्रेसचे तरुण तडफदार आमदार नितेश राणे यांनी सभागृहात केला. नितेश राणे यांनी पहिल्याच भाषणात सभागृहातील दोन्ही बाजूंच्या सदस्यांची मने जिंकली.

राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतक-यांच्या आत्महत्या या विषयावर सभागृहात नियम २९३ अन्वये सुरू असलेल्या चर्चेत सहभागी होताना नितेश राणे यांनी सभागृहात आमदार म्हणून केलेल्या पहिल्याच भाषणात संपूर्ण सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या भाषणाची दखल विरोधी बाकांवर तर घेतली गेलीच पण सत्ताधारी बाकांवरून त्यांच्या भाषणाची दखल घेतली गेली. चर्चेला सुरुवात करताना नितेश राणे म्हणाले की, मी पहिल्यांदाच या सभागृहात बोलणार आहे. ही संधी मला पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी आणि माझे नेते नारायण राणे यांच्या आशीर्वादाने मिळालेली आहे.
महाराष्ट्रातील दुष्काळावर चर्चा होणार आहे, असे कळल्यानंतर मी या पूर्वीच्या काही नेत्यांची सभागृहात मांडलेली मते जाणून घेण्यासाठी वाचनालयात जाऊन बसलो. गेल्या वर्षी हिवाळी अधिवेशनात आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री एकनाथ खडसे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भाषणे वाचली. ती आता माझ्या हातात आहेत. परंतु वेळ कमी असल्याने ते मी इथे वाचून दाखवणार नाही.
पण सुधीर मुनगंटीवार यांच्या भाषणाचा मी थोडासा उल्लेख करतो. ते तेव्हा म्हणाले होते, ‘‘राज्यात दुष्काळ पडलेला असताना सरकार कासव गतीने उपाय योजना करीत आहे. हे सरकार कासवछाप आहे.’’ मुनगंटीवार यांनी त्यावेळच्या सरकारला गती कमी असल्याने कासवाची उपमा दिली होती. मग आज शपथविधी झाल्यापासून हे सरकार काय करीत आहे. त्यांची गती इतकी का कमी आहे. आता त्यांच्यासोबत स्वत:ला वाघ म्हणून घेणारी शिवसेना आहे. सरकारच्या कारभाराची गती मंद झालेली असताना शिवसेना स्वस्थ कशी? वाघ म्हणवून घेणा-या शिवसेनेची शेळी झाली आहे काय? असा सवाल नितेश राणे यांनी करताच शिवसेनेच्या बाकावर चुळबूळ सुरू झाली. तेव्हा नितेश राणे म्हणाले मी वेगाबद्दल बोलतोय. तेव्हा सभागृहात हशा पिकला.

गिरीश बापट यांच्याकडून नितेश राणे यांचे अभिनंदन

अन्न-नागरी पुरवठा आणि संसदीय कामकाज मंत्री श्री. गिरीश बापट यांनी आमदार नितेश राणे यांच्या विधानसभेतील पहिल्याच भाषणाबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले आहे. विधान सभेचे उपसचिव विलास आठवले यांनीही नितेश राणे यांचे एका पत्राद्वारे खास अभिनंदन केले.