दुष्काळावरील चर्चेवेळी मुख्यमंत्री गैरहजर-विरोधकांचा गोंधळ

0
10

नागपूर – सभेत दुष्काळावर चर्चा सुरू असतानाच विरोधकांनी सभागृहात मुख्यमंत्री उपस्थित नसल्याच्या कारणावरून गोंधळ घातल्याने अध्यक्षांनी दहा मिनिटांसाठी सभागृह तहकूब केले. मात्र, या घटनेवर मुख्यमंत्री विरोधकांवर चांगलेच संतापले.

सभेत दुष्काळावर सुरू असतानाच विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात मुख्यमंत्री, अर्थमंत्री, महसूलमंत्री नसल्याच्या कारणावरून थयथयाट केला. वडेट्टीवारांची री ओढत कॉंग्रेससह राष्ट्रवादीच्या सदस्यांनीही गोंधळ घालण्यास सुरुवात केली. गोंधळामुळे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी दहा मिनिटांसाठी सभागृह तहकूब केले. दहा मिनिटांनंतर सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले. दुष्काळावर पुन्हा चर्चा सुरू होण्यापूर्वी त्यांनी विरोधकांवर शरसंधान साधले. यापूर्वी याच सभागृहात सदस्य बोलत असताना एक राज्यमंत्री बसून राहत होते, असा टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लावला. आता पाच-पाच मंत्री असताना सभागृह बंद पाडले. दुष्काळासारख्या गंभीर विषयावर चर्चा सुरू असताना त्यात अडथळा निर्माण केल्याने विरोधक शेतकऱ्यांबाबत गंभीर नसल्याचीच शंका त्यांनी उपस्थित केली. अडथळा निर्माण करू नका, तुम्ही सूचना करा, तुमच्या सूचना ऐकल्या जातील, या शब्दात त्यांनी विरोधकांना ठणकावले. त्यानंतर सायंकाळपर्यंत सभागृहात सर्वच सदस्यांनी शेतकऱ्यांसाठी उपाययोजना सुचविल्या. विरोधातील काही सदस्यांनी शेतकऱ्यांना अद्याप पॅकेज घोषित न केल्याबाबत सरकारला धारेवर धरत टीका केली. माजी मंत्री छगन भुजबळ यांनी शेतकऱ्यांचे वीजबिल व कर्ज माफ करण्याची मागणी केली. सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य गणपतराव देशमुख, सपाचे अबू आझमी, अमित देशमुख, बाळासाहेब थोरात, राजेश टोपे, शशिकांत खेडकर, मधुकर चव्हाण, संभाजी पाटील निलंगेकर, शशिकांत शिंदे, धैर्यशील पाटील, जय रावत, बच्चू कडू, हर्षवर्धन जाधव, यशोमती ठाकूर, सतीश पाटील, विनायक जाधव, अर्जुन खोतकर, हरीश पिंपळे, त्र्यंबक पिसे, आशीष देशमुख यांनीही दुष्काळावरील चर्चेत शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी करीत काही उपाययोजनाही सुचविल्या.