मुंबईतील भाजपच्या कार्यालयाला आग;अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

0
5

आग विझवण्याचे प्रयत्न सुरू

मुंबई:-एकीकडे निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच मुंबईतून एक मोठी बातमी समोर येत आहे. भाजपच्या मुंबईतील नरीमन पॉइंट येथील कार्यालयाला आग लागली आहे. आग लागल्यानंतर अवघ्या काही वेळातच आग भडकली. त्यामुळे धूर आणि आगीचे लोट पसरले होते. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी आग अटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं सांगण्यात येत आहे.

आज दुपारी ४.३५ वाजण्याच्या सुमारास भाजपच्या कार्यालयाला आग लागली आहे. नरीमन पॉइंट येथील भाजपच्या या कार्यालयाचं नुतनीकरणाचं काम सुरू होतं. कार्यालयातील किचनमध्ये काम सुरू होतं. या ठिकाणी वेल्डिंगचं काम सुरू असताना अचानक शॉर्ट सर्किट झाला आणि त्यानंतर आग लागली. त्यानंतर ही आग अधिकच भडकत गेली. ऑफिसमध्ये कागदपत्रे आणि लाकडी फर्निचर असल्याने आगीने अधिकच पेट घेतला आणि त्यामुळे धुराचे लोटही पसरले. हे धुराचे लोट मोठ्या प्रमाणावर पसरले. त्यामुळे या परिसरात काळोख पसरल्यासारखं वातावरण झालं.

या कार्यालयात भाजपचं सोशल मीडियाचं काम चालतं. त्यामुळे निवडणुका असल्याने आजही सोशल मीडियाचं काम सुरू होतं. तेवढेच कर्मचारी ऑफिसमध्ये होते. आग लागल्यानंतर या कर्मचाऱ्यांनी हातातील काम टाकून तात्काळ बाहेर धाव घेतली. सर्व कर्मचारी एका क्षणात ऑफिसच्या बाहेर पडले. त्यामुळे आगीत कोणीही अडकले नाही. अग्निशमन दलाला या आगीची माहिती देण्यात आली. त्यानंतर अवघ्या काही वेळात अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. या ठिकाणी आगीवर नियंत्रण मिळवण्याचं प्रयत्न सुरू आहेत.