स्फोटके बनवणाऱ्या चामुंडा कंपनीत स्फोट, पाच कामगारांचा मृत्यू

0
14
वाढदिवसाच्या शुभेच्छा

नागपूर : जिल्ह्यातील वाडीपासून काही अंतरावर असलेल्या धामनाजवळील स्फोटकं बवणाऱ्या चामुंडा कंपनीत मोठा स्फोट होऊन त्यात पाच कामगार दगावले असून आठ ते दहा कामगार जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. दगावलेल्यामध्ये चार महिला कामगारांचा समावेश आहे. घटनास्थळी गर्दी झाल्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला असून दगावलेल्या कामगारांच्या कुटुंबियांचा आक्रोश सुरू होता.

नागपूर जवळील धामना येथे स्फोटकं तयार करणारी चामुंडा कंपनी आहे. सकाळी दहा वाजता कंपनी सुरू झाल्यानंतर दुपारी १२.३० च्या सुमारास कंपनीत अचानक स्फोट झाल्यानंतर मोठा आवाज झाला. यावेळी कंपनीत १० ते १२ कामगार कामावर असताना त्यात ५ कामगारांचा कंपनीत मृत्यू झाला तर सात ते आठ कामगार गंभीर जखमी झाले असून त्यांना बाहेर काढण्यात आले आहे. दगावलेले कामगार वाडी आणि धामना परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली असून त्यांचे नातेवाईक घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी आक्रोश सुरू केला. घटनेनंतर लगेचच परिसरातील नागरिकांनी जखमी कामगारांना तात्काळ रविनंगरातील सेनगुप्ता रुग्णालयात हलविले असून त्यांच्यावर उपचार सुरू केले आहे. रुग्णालयात कामगारांच्या नातावाईकांची गर्दी झाली होती. दरम्यान कंपनीत स्फोट झाल्यामुळे धामना परिसर हादरुन गेला. आजूबाजूच्या कंपनीतील कामगार घटनास्थळी आले. राज्याचे माजी मंत्री अनिल देशमुख यांनी घटनास्थळी पोहोचल्यानंतर घटनेची माहिती घेत प्रशासनातील अधिकाऱ्यांशी व कंपनीच्या मालकांशी चर्चा केली.