तर विमान मालकाचाही प्रतिसाद नाही,अखेर उद्योगमंत्री उदय सामंत निराश होऊन मोटारीने झाले मार्गस्थ
अमरावती :-राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत शुक्रवारी नागपूर, अमरावती दौरा आटोपून छत्रपती संभाजीनगरला जाण्यासाठी अमरावती येथील बेलोरा विमानतळावर पोहोचले, तेव्हा वैमानिकाने टेक ऑफ करण्यास नकार दिला. त्यामुळे उद्योगमंत्र्यांना अखेर समृद्धी महामार्गाने मोटारीने संभाजीनगर गाठावे लागले. याप्रकरणी लोणी पोलिसांकडे तक्रार नोंदविण्यात आली आहे.
उद्योगभरारी या कार्यक्रमासाठी उद्योगमंत्री नागपूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर दौर्यावर होते. एकाच दिवशी तीन कार्यक्रम असल्याने मुंबईतील एका एअर कंपनीचे विमान नेमण्यात आले होते. दुपारी ४:३० वाजण्याच्या सुमारास ते अमरावती येथील बेलोरा विमानतळावर पोहोचले. सायंकाळी ६ वाजता छत्रपती संभाजीनगरला कार्यक्रम असल्याने ५ वाजता त्यांना ‘टेक ऑफ’ करायचे होते. मात्र, उद्योगमंत्री उदय सामंत विमानात बसण्यासाठी जात असताना वैमानिक गगन अरोरा यांनी पूर्वसूचना न देता त्यांचे साहित्य विमानातून बाहेर काढले. आपल्याला छत्रपती संभाजीनगरला पोहोचणे आवश्यक असून, टेक ऑफ करा, अशी विनंती सामंत यांनी वैमानिकाला केली; परंतु काही नियम सांगत वैमानिकाने स्पष्ट नकार दिला. त्यानंतर सामंत यांनी थेट कंपनीच्या मालकाशी संपर्क केला. मात्र, त्यांनीही प्रतिसाद दिला नाही.