गडचिरोलीत पूर , २०० गावांशी संपर्क तुटला

0
14

गडचिरोली,दि.09-गडचिरोली जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस येत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.200 गावांचा संपर्क तुटला असून अहेरी-भामरागड-आल्लापल्ली मार्ग बंद झाला आहे. प्रत्येक लहान मोठे नाले, नदी तुडुंब भरून वाहत आहेत. भामरागड़ तालुक्यातील परलकोट नदी वगळता जिल्ह्यातील कुठल्याच नदीच्या पुलावर पाणी नाही आहे. मात्र मु्ख्य रोडवर येत असलेल्या लहान मोठ्या नाल्यांच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक पूर्णपणे बंद आहे. प्रशासनाच्या वतीने अतिवृष्टिचा इशारा दिला असून नागरिकांनी सतर्क राहून अड़चन असल्यास प्रशासनाला माहिती देऊन सहकार्य करण्याचे आव्हान केले आहे.
जिल्ह्यात २४ तासात ८७.७ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर गडचिरोली शहरात १५७ मिमी पावसाची नोंद आहे. पोलिस प्रशासन आणि आपत्ति निवारण विभागाचे कर्मचारी अधिकारी कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी दक्ष आहेत.
जिल्ह्यातील अहेरी ते चंद्रपुरकड़े जाणार प्रमुख मार्ग चौड़ंमपल्ली गावजवळील पुलावरून पाणी वाहत असल्याने चंद्रपुरकड़े जाणार मार्ग बंद झाला आहे. तर अहेरी आलापल्ली कडून भामरागड़ जाणार मार्ग परलकोटा नदीच्या पुलावरून ३ फुट पाणी वाहत असल्याने मार्ग बंद झाला आहे आणि त्या भागातील विद्युत प्रवाह खंडित झाला आहे तसेच मोबाईल सेवा देखील पूर्णतः बंद पडली आहे. भामरागड़ येथील नागरिकांना प्रशासनाच्या वतीने सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. पावसाचा जोर असाच राहिला तर गडचिरोली मार्गे नागपुरकड़े जाणार मार्गावर असलेल्या कठानी नदीच्या पुरामुळे तोही मार्ग बंद होण्याची शक्यता आहे.