अदानी प्रकल्पाच्या वनजमिनी वळतीकरणाला स्थगिती

0
25
वाढदिवसाच्या शुभेच्छा

नागपूर – गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथील अदानी पॉवर महाराष्ट्र लिमिटेड या ऊर्जा प्रकल्पाला वनजमीन वळती करण्याचा 20 ऑक्‍टोबर 2014 च्या वळतीकरणाचा आदेशाला स्थगिती देण्यात आल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधान परिषदेत लेखी उत्तरात दिली.

याबाबत ख्वाजा बेग, हेमंत टकले, नरेंद्र पाटील यांनी प्रश्‍न उपस्थित केला होता. अदानी पॉवर यांच्या गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा औष्णिक ऊर्जा प्रकल्पासाठी वनजमीन वळतीकरणाचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठविला होता. केंद्र सरकारने काही अटी व शर्तीवर सदर प्रकल्पास तत्त्वतः मान्यता प्रदान केली. त्यामुळे 148 हेक्‍टर वनजमीन वळतीकरणास केंद्र सरकारने 2014 रोजी औपचारिक मान्यता दिली. राज्य सरकारने 20 ऑक्‍टोबर रोजी वनजमीन वळती करणाचे आदेश काढले. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार नागझिरा व्याघ्रप्रकल्पाच्या सीमेपासून दहा कि.मी.च्या आत असल्याने त्यास राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची मान्यता आवश्‍यक आहे. त्यांच्या आदेशाकरिता केंद्र सरकारकडे विचारणा करण्यात आलेली आहे. त्यामुळेच वनजमिनीच्या वळतीकरणाच्या आदेशाला स्थगिती देण्यात आली. वनजमीन अद्याप वळती करण्यात आलेली नसल्याचे वनमंत्री यांनी स्पष्ट केले.

अनाथ निराधार बालकांसाठी 35 कोटींची तरतूद – मुंडे
राज्यातील अनाथ व निराधार बालकांचा परिपोषण खर्च वेळेवर मिळावा यासाठी राज्याच्या यंदाच्या अर्थसंकल्पात 35 कोटींची तरतूद केली आहे, अशी माहिती महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.

याबाबत सुभाष झांबड, भाई जगताप, संजय दत्त यांनी प्रश्‍न उपस्थित केला होता. महिला व बालकल्याणमंत्री म्हणाल्या, संगणक वितरण प्रणालीवर 21 कोटी एवढी तरतूद प्राप्त झाली. प्राप्त झालेल्या तरतुदीपैकी 20 कोटी 85 लाख 66 हजार इतकी रक्कम संबंधितांना वितरित केल्याचे स्पष्ट केले.

अंगणवाडीसेविकांची पदे भरणार – मुंडे
राज्यातील अंगणवाडीसेविकांची हजारो पदे त्वरित भरण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे, अशी माहिती महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.
याबाबत सुधीर तांबे, विक्रम काळे, संजय दत्त यांनी प्रश्‍न उपस्थित केला होता. ऑगस्ट 2014 च्या मासिक प्रगती अहवालानुसार अंगणवाडीसेविकांची 2,250 व मिनी अंगणवाडीसेविकांची 1,257 असे एकूण तीन हजार 507 पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्याबाबत वेळोवेळी आदेश दिले आहेत. तथापि, भरतीप्रक्रिया त्वरित होण्यासाठी मुलाखतीचे गुण वगळून गुणवत्तेच्या आधारावर करण्याचा निर्णय 13 ऑगस्ट 2014 रोजी शासनाने घेतला असल्याचे महिला व बालकल्याणमंत्री यांनी सांगितले.

यवतमाळ जिल्हा परिषदेतील परिचरपदाची परीक्षा जानेवारीत – मुंडे
यवतमाळ जिल्हा परिषदेतील विविध पदांच्या भरतीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत गैरप्रकार झाला आहे. प्रश्‍नपत्रिकेच्या उत्तरपत्रिका आर्थिक गुन्हे शाखा औरंगाबाद यांनी जप्त केल्या आहेत. 11 जणांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले आहे. विविध पदांच्या परीक्षा रद्द केल्या आणि नव्याने परीक्षा घेतल्या आहे, अशी माहिती महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेत लेखीस्वरूपात दिली.

याबाबत धनंजय मुंडे, अमरसिंग पंडित, सतीश चव्हाण, जोगेंद्र कवाडे, शरद रणपिसे, हरिसिंग राठोड यांनी तारांकित प्रश्‍न उपस्थित केला होता. 22 नोव्हेंबर रोजी परिचय या पदाची लेखी परीक्षा सुरू असताना केंद्रातील समवेक्षक केंद्राच्या बाहेर केल्यामुळे त्यांना निलंबित केले आहे. त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल केला. यामुळेच परिचर या पदाची लेखी परीक्षा रद्द केली असून, नव्याने चार जानेवारी 2015 रोजी परीक्षा घेण्याचा निर्णय जिल्हा निवड समितीने घेतला आहे, असे मुंडे म्हणाले.

बालकामगारांच्या सुटकेसाठी जिल्हास्तरीय कृतिदल – मुंडे
बालकामगारांची सुटका करण्यासाठी राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कृतिदलाची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी आज विधानपरिषदेत लेखी स्वरूपात दिली.

ैयाबाबत प्रकाश गजभिये, भाई जगताप, अमरनाथ राजूरकर यांनी प्रश्‍न उपस्थित केला होता. या कृतिदलामार्फत वेळोवेळी धाडी टाकून बालकामगारांची सुटका करण्यात येते. सुटका केलेल्या बालकामगारांना त्यांच्या पुढील पुनर्वसनासाठी बालकल्याण समितीच्या आदेशान्वये बालसभागृह दाखल करण्यात येते. सदर बालगृहामध्ये त्यांना अन्न, वस्त्र, निवारा, व्यवसाय प्रशिक्षण, शिक्षण, समुपदेशन व आरोग्याच्या सुविधा पुरवून त्यांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला जातो. या बालकामगारांना संस्थाबाह्य सेवा बालसंगोपन योजनेअंतर्गत 425 रुपये दरमहा त्यांचे शिक्षण व इतर खर्च भागविण्यासाठी अनुदान दिले जाते, असेही महिला व बालविकासमंत्री यांनी सांगितले.