नागपूर – पुणे विद्यापीठाला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्याचा निर्णय झाल्यावर सोलापूर, उत्तर महाराष्ट्र, मुंबई आणि गोंडवाना विद्यापीठाच्या नामकरणाचीदेखील मागणी करण्यात आली. सुनील तटकरे यांनी सोलापूर विद्यापीठाला अहल्याबाई होळकर यांचे नाव देण्याची मागणी करताच इतर विद्यापीठांच्या नामकरणाचा मुद्दाही काही सदस्यांनी उपस्थित केला.
महाराष्ट्र विद्यापीठ (सुधारणा) विधेयक विधान परिषदेत मंजूर झाले. त्यानंतर निर्णयाचे अभिनंदन करण्यासाठी सदस्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. माजी मंत्री सुनील तटकरे यांनी या निर्णयाचे स्वागत करतानाच सोलापूर विद्यापीठाला अहल्याबाई होळकर यांचे नाव द्यावे, अशी मागणी केली. “”अहल्याबाई होळकर यांचे समाजासाठी मोठे योगदान आहे. भारतभर अनेक हिंदू मंदिरे आणि नदीघाट त्यांनी बांधले. अनेकांचा त्यांनी जीर्णोद्धार केला. अनेक मंदिरांच्या त्या आश्रयदात्या होत्या. अहल्याबाईंचे कार्य नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरावे, या उद्देशाने सोलापूर विद्यापीठाचे नामकरण अहल्याबई होळकर विद्यापीठ असे करावे,‘‘ असे सुनील तटकरे म्हणाले. सभापती शिवाजीराव देशमुख यांनी या मागणीची नोंद घेण्याची सूचना शिक्षणमंत्र्यांना केली. जयंत जाधव यांनी याच धरतीवर उत्तर महाराष्ट्र आणि मुंबई विद्यापीठाच्या नामकरणाचा मुद्दा उपस्थित केला. “उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला खानदेश कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव, तर मुंबई विद्यापीठाला राजमाता जिजाऊ यांचे नाव देण्यात यावे,‘ अशी मागणी त्यांनी केली. अभिनंदनाच्या प्रस्तावाच्या निमित्ताने नव्या मागण्यांचा ओघ सुरूच होता. प्रा. जोगेंद्र कवाडे यांनीसुद्धा यात सहभाग घेतला आणि गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाला शहीद बिरसा मुंडा यांचे नाव देण्याची मागणी सभागृहात केली. पुणे विद्यापीठाच्या नामकरणाच्या निमित्ताने झालेल्या चारही मागण्यांची सरकारतर्फे नोंद घेण्यात आली.