राज्यातील विदर्भात १० दिवसांत पाच वाघ मृत्युमुखी…

0
82

नागपूर : राज्यात एकीकडे वाघांची संख्या वाढत असताना अवघ्या दहा दिवसांत पाच वाघ मृत्युमुखी पडले. २०२३च्या तुलनेत २०२४ मध्ये राज्यात वाघांच्या मृत्यूचा आलेख ५० टक्क्यांनी खाली होता. मात्र, आता पुन्हा नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच वाघांच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे.
वाघांची संख्या सर्वाधिक असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात नुकतीच वाघांच्या वाढत्या संख्येच्या व्यवस्थापनावर राष्ट्रीय परिषद पार पडली. देशभरातील तज्ज्ञ, शास्त्रज्ञ, आजी व माजी अधिकारी यात सहभागी झाले. मात्र, या परिषदेच्या आयोजनाची धावपळ सुरू असतानाच अवघ्या दहा दिवसात पाच वेगवेगळ्या ठिकाणी वाघांच्या मृत्यूच्या घटना समोर आल्या. विशेष म्हणजे, अभयारण्य किंवा व्याघ्रप्रकल्पाच्या बाहेर हे मृत्यू झाले आहेत. यातील काही मृत्यू संशयास्पद आहेत. यवतमाळच्या प्रकरणात वाघाचे दात आणि नखे गायब आहेत. तर भंडाऱ्याच्या प्रकरणात चक्क वाघाचे तुकडे सापडले. दरम्यान, या पाच वाघांपैकी दोन मृत्यू हे अवघ्या पाच ते सहा महिन्यांच्या बछड्यांचे आहेत.
वाघांचे मृत्यू, केव्हा व कुठे?
२ जानेवारी २०२५ – चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही वनपरिक्षेत्रात शेतातील नाल्याजवळ वाघाचा मृतदेह आढळला. सर्व अवयव शाबूत असले तरीही मृत्यू संशयास्पद.

६ जानेवारी २०२५ – भंडारा जिल्ह्यातील तुमसर वनपरिक्षेत्राअंतर्गत घनदाट जंगलात वाघाचा मृतदेह आढळला. मृतदेहाचे तीन तुकडे करून जंगलात फेकण्यात आले.

७ जानेवारी २०२५ – यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील उकणी येथील खुल्या कोळसा खाणीच्या मुख्य मार्गावर वाघाचा अर्धवट कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. वाघाचे दोन दात आणि १२ नखे गायब.

८ जानेवारी २०२५ – नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्रप्रकल्पालगत प्रादेशिक वनविभागात वाघिणीच्या बछड्याचा मृतदेह आढळला. दहा दिवसांपासून त्याच्या पोटात अन्न नसल्याने उपासमारीने मृत्यू.

९ जानेवारी २०२५ – चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या मूल बफर क्षेत्रात वाघिणीच्या पाच ते सहा महिन्यांच्या बछड्याचा मृतदेह आढळला. मोठ्या वाघाने या बछड्याला मारल्याचे समोर.