नंदुरबार : अभिनेता बोमन इराणी यांनी दोन्ही हातांनी लिहणाऱ्या ‘व्हायरस’ ची भूमिका साकारलेला ‘थ्री इडीयटस् ‘ हा चित्रपट गेल्या काही वर्षांपूर्वी येवून गेला. हा चित्रपट पाहताना कोणी विचार केला तर हे वास्तवात होवू शकते का? तर बहुधा नाही, असेच उत्तर येईल. पण, नंदुरबारच्या आदिवासी भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील सर्वच विद्यार्थी चक्क दोन्ही हातांनी पाढे, बाराखडी, इंग्रजी, मराठी शब्द लिहितात. हे अफलातून टॅलेंट दिसून येत आहे ते तालुक्यातील बालआमराई जिल्हा परिषदेच्या शाळेत.
या शाळेत 30 पटसंख्या असून पहिली ते चौथीच्या चार वर्गांसाठी दोन शिक्षक आहेत. मात्र, येथील विद्यार्थी इंग्रजी माध्यमातील शाळांमधील विद्यार्थ्यांनाही लाजवतील असे इंग्रजीचे वाचन करतात, गणितातील ३० पर्यंतचे पाढे तोंडपाठ अचूक म्हणतात. उलटी उजळणी करण्यात इथले चिमुकल्यांचा झालेला सराव लक्ष वेधून घेतो. यामुळेच की काय, ही शाळा अनोखी ठरत आहे.
दोन्ही हातांनी लिहितात चिमुकले
सध्या इंग्रजी शाळांमध्ये शिक्षणासाठी पालक, विद्यार्थ्यांची धडपड सुरु आहे. त्यातच जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये गुणवत्ता घसरत असल्याची चर्चा कायम आहे. शिक्षक लक्ष देत नाही, शाळा नियमित भरत नाही, शिक्षक नीट शिकवत नाहीत, आजकाल जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना काहीही येत नाही, अशी ओरड सातत्याने असते. मात्र, यास आपली गुणवत्ता सिध्द करत सणसणीत चपराक लगावलीय ती बालआमराई येथील जिल्हा परिषदेच्या शाळेने. सुमारे आठशे एवढी लोकसंख्या असलेल्या या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत येथील विद्यार्थी मराठी असू देत कि इंग्रजी अथवा गणित… विषय कोणताही असला तरी दोन्ही हातांनी लिहितात. फळ्यावरदेखील तेवढेच सुंदर, सुवाच्च यांचे मोत्यासारखे अक्षर एकाचवेळी दोन्ही हातांनी गिरवतात.
शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर केलेल्या मेहनतीनेच हे शक्य
येथल्या विद्यार्थ्यांना पाढे म्हणायला लावले तर एकमेकांमध्ये स्पर्धा करतात. म्हणी, समानार्थी, विरुध्दार्थी शब्द तोंडपाठ चालीवर म्हणतात, हे विशेष. आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करण्याची यांची तऱ्हा न्यारीच, इंग्रजी वाचन अस्खलित आणि स्पष्ट. एखाद्या छोट्याशा गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणारे आदिवासी विद्यार्थी एवढे हुशार असतील, याची कल्पनाही कोणी केली नसावी. बाहेरुन आलेल्या व्यक्तींशी संभाषण करताना सर्वच विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास कमालीचा आहे. यामुळे साहजिकच येणारा प्रत्येक जण या पोरांचे कौतुक करत असल्याचे पहायला मिळते. येथील शिक्षक देवराम पाटील व शामलाल अहिरे यांनी विद्यार्थ्यांसाठी घेतलेली मेहनतीमुळेच हे शक्य असल्याच्या प्रतिक्रिया पालकांकडून व्यक्त करण्यात आल्या आहेत.