10 किमी अंतर कापण्यासाठी लागतो अर्ध्या तासापेक्षा अधिक वेळ
पुणे : शहरात उद्योग उभे राहिले. शिक्षणाच्या चांगल्या संधी निर्माण झाल्या. यामुळे शहराचा विकास चौफेर झाला आहे. बाहेरुन पुणे शहरात येणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. यामुळे सर्वात जास्त वाहने पुणे शहरात आहेत. दुचाकीचे शहर म्हणून पुण्याची ओळख आहे. यामुळे पुणे शहरात वाहतूक कोंडींचा प्रश्न सातत्याने सतावताना दिसत आहे. दरम्यान याबाबत शहरात विविध उपाययोजना केल्या जात आहेत. नवीन उड्डाणपूल, एकेरी वाहतूक, मेट्रोही सुरू करण्यात आली आहे. असे असताना देखील पुण्यातील वाहतूक कोंडी कमी झालेली नाही. प्रचंड वाहतूक कोंडीचे शहर म्हणून पुणे देशात तिसऱ्या क्रमांकावर आले आहे.
याबाबत टॉमटॉम ट्रॅफिक रिसर्च या संस्थेने अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात कोलकता हे देशातील पहिले, बेंगळुरू दुसरे तर पुणे हे सर्वाधिक वाहतूक असलेले तिसऱ्या क्रमांकाचे शहर बनले आहे. २०२३ मध्ये पुणे यामध्ये सातव्या क्रमांकावर होते. देशातील सर्वात मोठ्या गर्दीचे आणि वाहतुक कोंडी होणाऱ्या शहरात जगात पुणे भारतात तिसऱ्या क्रमांकावर आहे.
यामध्ये दुसऱ्या स्थानावर बेंगळुरू तर पहिल्या क्रमांकावर कोलकाता शहराचा समावेश आहे. २०२३ मध्ये देखील पुणे सर्वाधिक वाहनांचे शहर होते. त्यानंतर आता २०२४ च्या टॉमटॉमरिसर्चचा अहवालात पुणे वाहतूक कोंडीच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकाचे शहर बनले आहे. पुण्यात १० किमी अंतर कापण्यासाठी तब्बल ३३ मिनिटांचा कालावधी लागतो.
डच लोकेशन टेक्नॉलॉजी स्पेशालिस्ट टॉमटॉम यांनी जारी केलेल्या ट्रॅफिक इंडेक्स रिपोर्टनुसार, कोलकातामध्ये १० किलोमीटर अंतर कापण्यासाठी सरासरी ३४ मिनिटे आणि ३३ सेकंद लागतात. तर बेंगळुरूमध्ये ३४ मिनिटे आणि १० सेकंद लागतात. पूर्वीच्या अहवालात बेंगळुरू हे भारतातील सर्वात जास्त वाहतूक कोंडीचे शहर मानले जात होते, परंतु २०२४ मध्ये कोलकाता यादीत पुढे आले आहे.
२०२४ मध्ये, कोलकातामध्ये वाहनांचा सरासरी वेग फक्त १७.४ किलोमीटर प्रति तास होता. जो भारतातील सर्वात कमी वेग होता. बेंगळुरूमध्ये हा वेग ताशी १७.६ किमी होता. तर, पुण्यात १० किलोमीटर अंतर कापण्यासाठी ३३ मिनिटे आणि २२ सेकंद लागतात. जागतिक स्तरावरही कोलकाता दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर बेंगळुरू आणि पुणे अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत. कोलंबियातील बॅरनक्विला शहराला जगातील सर्वात संथ गतीचे शहर घोषित करण्यात आले, जिथे वाहने सरासरी १०.३ मैल प्रति तास वेग एवढा आहे.
हैद्राबाद, चेन्नई आणि मुंबई सारख्या शहरांमधील वाहतूक परिस्थिती देखील चिंताजनक असल्याचे या अहवालात म्हंटले आहे. या शहरांमध्ये सरासरी १० किलोमीटर अंतर कापण्यासाठी ३२, ३० आणि २९ मिनिटे लागतात. तर दिल्लीत हा वेळ तुलनेने कमी आहे, दिल्लीत १० किमी अंतर कापण्यासाठी फक्त २३ मिनिटे लागतात.