गोव्यात पॅराग्लायडिंग करताना मोठी दुर्घटना;दरीत पडून पुण्यातील तरुणीचा आणि पायलटचा मृत्यू

0
142

पणजी:-गोव्यात पॅराग्लायडिंग करताना दरीत पडून पुण्यातील एका महिला पर्यटक आणि पायलटचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी पॅराग्लायडिंग कंपनीच्या मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्याला अटकही केली आहे, अशी माहिती मिळत आहे. सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

गोव्याला फिरण्यासाठी पुण्याहून आलेला पर्यटकांचा एक ग्रुप शनिवारी सायंकाळी ५ च्या सुमारास केरी येथे पॅराग्लायडिंग करण्यासाठी आला होता. येथील ज्या डोंगरावरुन पैराग्लाइडिंग केले जाते त्या ठिकाणी हा ग्रुप पोहोचला. यावेळी यातील एका महिला पर्यटकाने पायलटसह डोंगरावरून उड्डाण केले. थोड्यावेळातच त्यांचे पैराग्लायडर दरीत कोसळले आणि यात दोघांचा मृत्यू झाला. ग्लायडरची दोरी तुटल्याने ते कोसळल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी मांद्रे पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

गोव्याचे पोलीस महासंचालक आलोक कुमार यांनी सांगितले की, कंपनी आणि तिच्या मालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीवर परवानगीशिवाय आणि योग्य सुरक्षा उपकरणांची व्यवस्था न करता पर्यटकाला पॅराग्लायडिंग नेल्याचा आरोप आहे. कंपनीच्या हलगर्जीपणामुळेच दोघांचा उंचीवरुन कोसळून मृत्यू झाला. पोलीस या अपघाताचा तपास करीत आहेत.