देवरी पंचायत समितीच्या सभापतीपदी अनिल बिसेन?

0
216

■राजकीय हालचालींनी वेग

देवरी,दि.१९: देवरी पंचायत समिती सभापतीची निवडणूक उद्या सोमवारी (दि. २०)रोजी नियोजित आहे. सभापतिपद सर्वसाधारण साठी आरक्षित असल्याने विद्यमान उपसभापती अनिल बिसेन यांची सभापतिपदी वर्णी जवळपास निश्चित मानली जात आहे.
देवरी येथील पंचायत समितीत एकूण १० सदस्य संख्या असून यात भाजपचे सहा तर काँग्रेसचे चार सदस्य आहेत. सत्ता भाजपची असली तरी काँग्रेसच्या चार सदस्यांनी अनिल बिसेन यानांच मतदान केल्यास आश्चर्य वाटू नये.
मागील अडीच वर्षापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात आरक्षण सोडत दरम्यान सहाही पंचायत समिती सर्वसाधारणासाठी आरक्षण निघाले होते. नंतर महिला प्रवर्गासाठी चिठ्ठी टाकण्यात आली होती. तेव्हा मात्र सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी देवरी पंचायत समितीचे आरक्षण निघाले होते. सर्वसाधारण (महिला) आरक्षण असल्याने भाजपच्या अंबिका बंजार यांची सभापतिपदी तर उपसभापति पदी अनिल बिसेन यांची वर्णी लागली होती.
मागील अडीच वर्षाच्या उपसभापतिपदाच्या कारकिर्दीत अनिल बिसेन यांनी मनरेगा अंतर्गत पंचायत समितीत १८० कोटींची कामे केली आहेत तर गुरांचे सहा हजार गोठेचे निर्माण करणारी महाराष्ट्रातील एकमेव पंचायत समिती ठरली आहे. त्यामुळे आमदार संजय पुराम यांच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या या उतुंग भरारीची दखल भाजप पक्षश्रेष्ठींनी सुद्धा घेतल्याची माहिती आहे.

भाजपकडे बहुमत आहे.

देवरी पंचायत समितीत भाजपला बहुमत आहे. त्यामुळे सभापती हा भाजपचा होणार यात शंका नाही. पंचायत समितीचे १९ वे सभापती म्हणून अनिल बिसेन यांच्या नावाची केवळ औपचारिक घोषणा होणे बाकी आहे हे, येथे उल्लेखनीय.