छत्तीसगड-ओडिशा सीमेवर चकमकीत १४ नक्षलवादी ठार

0
19
file photo

गडचिरोली : छत्तीसगड-ओडिशा सीमेवर मंगळवारी सकाळी झालेल्या चकमकीत १४ नक्षलवाद्यांना ठार करण्यात छत्तीसगड पोलिसांना यश आले. मृत नक्षलवाद्यांमध्ये ओडिशा राज्याचा प्रभारी, केंद्रीय समिती सदस्य जयराम ऊर्फ चलपती याचा समावेश असून त्याच्यावर विविध राज्यांमध्ये एक कोटीपेक्षा अधिकचे बक्षीस होते. मिलिंद तेलतुंबडेनंतर चकमकीत ठार झालेला जयराम हा दुसरा केंद्रीय समिती सदस्य आहे. अजूनही चकमक सुरू असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

छत्तीसगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळच्या सुमारास छत्तीसगड-ओडिशा सीमेवरील गरियाबंद जिल्ह्यातील मैनपूर कुल्हाडीघाट जंगल परिसरात मोठ्या संख्येने नक्षलवादी एकत्र आल्याची माहिती सुरक्षा यंत्रणेला मिळाली होती. यावरून त्याभागात एक हजाराहून अधिक सुरक्षा जवानांनी संयुक्तपणे नक्षलविरोधी अभियान राबाविले. दरम्यान, जंगलात दडून बसलेल्या नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने जोरदार गोळीबार केला. सुरक्षा जवानांनीदेखील तेवढ्याच प्रखरतेने प्रत्युत्तर दिले. पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवादी जंगलाचा दिशेने पळून गेले.

बिजापूर येथील हल्ल्यात १२ जवान शहीद झाल्यानंतर सुरक्षा यंत्रणेने नक्षलविरोधी मोहीम अधिक तीव्र केली असून नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात आत्तापर्यंत ४४ नक्षलवाद्यांना ठार करण्यात यंत्रणेला यश आले आहे.

नक्षलवादाला हा मोठा धक्का आहे. सुरक्षा दलांच्या प्रयत्नातून मोदी सरकार देशातून नक्षलवाद संपुष्टात आणेल. -अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री