चंदीगड:-काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या निकटवर्तीय आणि ‘भारत जोडो’ यात्रेत त्यांच्याबरोबर चाललेल्या महिला नेत्याची हत्या करण्यात आली आहे. हरियाणा येथील रोहतकमध्ये ही घटना घडली असून काँग्रेस महिला नेत्याचा मृतदेह सुटकेसमध्ये सापडल्याने रोहतसह हरियाणात एकच खळबळ उडाली आहे. हिमानी नरवाल असे महिला नेत्याचे नाव असून त्या हरियाणा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रचारात सक्रिय होत्या.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी काढलेल्या ‘भारत जोडो’ यात्रेत अनेक मोठे चेहरे सहभागी झाले होते. अनेकांचे फोटोही व्हायरल झाले होते. तर याच फोटोंवरून भाजपने राहुल गांधींना घेरले होते. असाच एक फोटो हिमानी नरवाल यांचा व्हायरल झाला होता. जो ‘भारत जोडो’ यात्रेतील राहुल गांधी यांच्यासोबतचा होता. हिमानी नरवाल हरियाणा काँग्रेसच्या युवती नेत्या होत्या. त्यांच्या समाज माध्यमांवर त्यांनी अनेक नेत्यांसोबतची छायाचित्रे प्रसिद्ध केली होती. पण आता त्यांची हत्या झाल्याचे उघड झाले असून सुटकेसमध्ये सापडला आहे. हिमानीच्या हातावर मेहंदी होती. गळ्यात काळी ओढणी, पांढऱ्या रंगाचा टॉप अन् लाल पँट होती. मृतदेह पाहिल्यानंतर गळा दाबून हत्या केली, त्यानंतर मृतदेह सुटकेसमध्ये टाकून फेकल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.
रोहतकमधील सांपला येथून जाणाऱ्या फ्लायओव्हर जवळ हा मृतदेह दिसून आला. एका बंद सुटकेसमध्ये हाताला मेहंदी असलेल्या तरुणीचा मृतदेह मिळाल्याने एक खळबळ उडाली होती. यानंतर पोलिसांना सुटकेसमध्ये एका तरुणीचा मृतदेह सापडल्याची माहिती देण्यात आली होती. पण लगेच काही या मृतदेहाची ओळख पटली नव्हती. त्यामुळे पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. तसेच मृतदेहाची ओळख पटावी म्हणून रोहतक पीजीआयमध्ये तिचा मृतदेह ठेवला होता. यादरम्यान पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार काँग्रेस नेत्या हिमानी नरवाल यांचा तो मृतदेह असल्याचे उघड झाले आहे. तर हिमानी नरवाल यांचा गळा दाबून हत्या करण्यात आली आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू असल्याचे समलखा पोलिस ठाण्याचे निरीक्षक बिजेंद्र सिंह यांनी सांगितले.