अवघ्या चार दिवसांत शहबाज शरीफ यांनी गुडघे टेकले

0
26

नवी दिल्ली:- पाकिस्तान काही केला सुधारणारा देश नाही हे पुन्हा एकदा त्यानं स्वता: सिद्ध करून दाखवलं आहे. युद्धबंदीची घोषणा झाल्यानंतर काही तासांतच पाकिस्ताननं युद्धबंदीचे उल्लंघन केले. त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने विक्रम मिस्री यांनी पत्रकर परिषद घेत लष्कराला कडक प्रत्युत्तर देण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे सांगितले. त्यामुळे शस्त्रसंधी उल्लंघनानंतर हालचालींना वेग आला आहे आणि आता भारत मोठा निर्णय घेईल, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे.

तर दुसरीकडे पाकिस्तान सैन्याने पंतप्रधानांच्या विरोधात बंड केलं असल्याचेही बोलले जात आहे. मात्र पाकिस्तानने भारतासमोर शरणागती पत्करली आहे. पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी अमेरिकेला फोन करून भारतासोबत युद्धबंदीची मागणी केली. तथापि, युद्धबंदीच्या काही तासांनंतरच पाकिस्तानी सैन्याने पुन्हा त्याचे उल्लंघन केलं हे ही तितकेच खरं आहे. या मुद्द्यावर, परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषदेत पाकिस्तानला या उल्लंघनांना तोंड देण्यासाठी योग्य पावले उचलण्याचे, परिस्थितीला गांभीर्याने आणि जबाबदारीने हाताळण्याचे आवाहन केले. किंबहुना 4 दिवसांनी का होईना, युद्धबंदीची घोषणा करण्यापूर्वीच भारताने पाकिस्तानचे कंबरडे मोडले होते.

गेल्या 4 दिवसांत भारतीय हवाई दलाने लाहोरमध्ये असलेली पाकिस्तानची हवाई संरक्षण प्रणाली नष्ट केली. याशिवाय, त्यांच्या तीन हवाई तळांवर हल्ला करून त्यांचे मनोबल खचले. त्यांची रडार यंत्रणा ही नष्ट झाली आहे. हे घडताना पाहून पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी माफी मागण्यास सुरुवात केली आणि युद्धबंदीचे आवाहन केलंय. भारताने लक्ष्य केलेल्या चार पाकिस्तानी एअरबेसमध्ये मुरीद चकवाल एअरबेस, नूर खान एअरबेस (रावळपिंडी), रहीम यार खान एअरबेस आणि रफीकी एअरबेस (शोरकोट, पंजाब) यांचा समावेश आहे. भारताच्या हवाई संरक्षण प्रणाली S-400 ने पाकिस्तानचे हवाई हल्ले निष्फळ केले, ज्यामुळे पाकिस्तान खूप घाबरला.

भारत-पाकिस्तान युद्धबंदीची घोषणा सर्वप्रथम अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर एका पोस्टद्वारे केली होती. त्यांनी लिहिले की, अमेरिकेच्या मध्यस्थीने रात्रीच्या दीर्घ चर्चेनंतर, मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की भारत आणि पाकिस्तानने पूर्ण आणि तात्काळ युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे. किंबहुना, भारताने युद्धबंदीसाठी स्वतःच्या अटी देखील ठेवल्या, ज्या अमेरिकेने मान्य केल्या. दरम्यान, यापूर्वी भारताने स्पष्टपणे सांगितले होते की जर सीमेवर कोणताही हल्ला झाला तर तो युद्धाचा गुन्हा मानला जाईल. भारताचा हल्ला पाहून पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी अमेरिकेला फोन करून युद्धबंदीची मागणी केली, त्यानंतर मार्को रोबियो यांनी भारताला फोन करून संपूर्ण हकीकत सांगितली आणि युद्धबंदीवर संमती मागितली.