रॉबर्ट वढेरांच्या जमीन प्रकरणातील कागदपत्र गहाळ

0
10

चंदीगड : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांच्या हरियाणातील जमीन प्रकरणात आणखी एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. वढेरा यांच्या जमीन लिलाव प्रकरणातील फाईलमधील दोन पानं गहाळ झाल्याचं उघड झालं आहे.

या पानांवर अधिकाऱ्यांनी काही टिपण्णी लिहिली होती. आयएएस अधिकारी अशोक खेमका यांनी मागवलेल्या माहिती अधिकारातून ही बाब समोर आली आहे.

इंडियन एक्स्प्रेसच्या बातमीनुसार जमीन घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या तीन सदस्यांच्या समिती संदर्भातील माहिती ही गहाळ झालेल्या दोन पानांवर होती. विशेष म्हणजे याच समितीने वढेरांची कंपनी स्कायलाईटला क्लीन चीट दिली होती. तसंच डीएलएफ-स्कायलाईट डीलचं म्युटेशन रद्द करणाऱ्या आयएएस अशोक खेमका यांच्यावर अविश्वास दाखवला होता.

या प्रकरणातील महत्त्वाची कागदपत्रे गहाळ झाल्याने अशोक खेमका यांना सीएम ऑफिसमधील कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.