👉रुग्णालयात केले दाखल
👉आंदोलनस्थळी मोठा गोंधळ
नवी दिल्ली:-राजधानी दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर मागील २० दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना पोलीसांनी आंदोलनस्थळावरून हटवले असून त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. वांगचूक यांच्या आरोग्याची खालावलेली स्थिती पाहता पोलीसांनी हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीसांनी सोनम वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून हटवल्याने याठिकाणी मोठा गोंधळ झाल्याचे समजते आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या 21 दिवसांपासून सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी आंदोलन स्थळावरुन हटवलं आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी आंदोलन स्थळावरुन हटवल्याची माहिती मिळतेय. दिल्लीतील जंतर-मंतर येथे गेल्या 20 दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी रुग्णालयात नेले आहे. ‘नीट’ (NEET) सारख्या प्रमुख परीक्षांमधील पेपरफुटीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत वांगचुक 28 जूनपासून उपोषणावर होते.
CJP प्रवक्त्यांची माहिती
‘कॉकरोच जनता पार्टी’चे (CJP) प्रवक्ते सौरभ दास यांनी या परिस्थितीबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, दिल्ली पोलिसांनी अभिजीत दिपके यांना त्यांच्या निवासस्थानावरून ताब्यात घेतलं. ते पुढे म्हणाले, “मला लोकांकडून समजलं की, सोनम वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून हटवलं जातंय आणि विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला जातोय…” जंतर-मंतर येथे CJP च्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान, 20 जुलै रोजी संसदेवर मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. मात्र, त्याआधीच सोनम वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून हटवण्यात आलंय.
सोनम वांगचूक यांच्यावरील कारवाईवर दिल्ली पोलिसांचं म्हणणं काय?
सोनम वांगचुक यांची खालावलेली प्रकृती यासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. त्यापूर्वीच पोलिसांनी जंतर-मंतर इथे ही कारवाई केली. प्रत्येक नागरिकाचा जीव मौल्यवान आहे, हे लक्षात घेऊन, न्यायालयानं यापूर्वीच सोनम वांगचुक यांची दररोज वैद्यकीय तपासणी करण्याचं, तसेच त्यांच्या प्रकृतीवर नियमित देखरेख ठेवून त्यांना आवश्यक वैद्यकीय मदत पुरवण्याचे निर्देश दिले होते.
सोनम वांगचुक यांचा VIDEO मेसेज
सलग 20 दिवसांच्या उपोषणानंतर सोनम वांगचुक यांची प्रकृती सतत खालावत होती, वांगचुक यांनी शुक्रवारी रात्री एक व्हिडीओ मेसेज जारी केलेला. ज्यामध्ये त्यांनी आपलं सुमारे 20 टक्के वजन कमी केल्याचं सांगितलं. तसेच, त्यांच्या स्नायूंवरही परिणाम झाल्याचं त्यांनी नमूद केलंय. तरीही त्यांचं मनोधैर्य आणि मानसिक स्थिती खंबीर होती.
या व्हिडीओद्वारे, वांगचुक यांनी 20 जुलै रोजी नियोजित असलेल्या ‘चलो संसद’ (संसदेकडे कूच) रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन नागरिकांना केलेलं. त्यांनी म्हटलं की, जर कांद्याच्या दरांबाबत सरकारला जबाबदार धरलं जाऊ शकतं, तर लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य आणि शिक्षण व्यवस्थेतील कथित अनियमितता यांबाबतही सरकारची जबाबदारी निश्चित केलीच पाहिजे. ‘नीट’ (NEET) परीक्षा वादाच्या पार्श्वभूमीवर अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचा दावा त्यांनी आपल्या व्हिडीओमध्ये केला आणि या मुद्द्यावर सरकारनं उत्तर दिलंच पाहिजे, असं ठामपणे सांगितलं.
सोनम वांगचुक यांची मागणी नेमकी काय?
सोनम वांगचुक आणि या आंदोलनाशी संबंधित संघटनांची एक प्रमुख मागणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा ही होती. स्पर्धा परीक्षांमधील कथित अनियमितता आणि प्रश्नपत्रिका फुटण्याच्या घटनांमुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत झालाय, असा आरोप त्यांनी केला. तसेच, आंदोलकांनी ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’च्या (NTA) कामकाजाची निष्पक्ष चौकशी, प्रश्नपत्रिका फुटण्याच्या प्रकरणांची पारदर्शक तपासणी आणि परीक्षा पद्धतीत व्यापक सुधारणा करण्याची मागणीही केली.





