नवी दिल्ली, दि. २० – गेल्या काही दिवसांपासून भाजपा नेत्यांकडून अनेक वादग्रस्त विधाने होत असून त्यामुळे पक्ष चांगलाच अडचणीत सापडला आहे. विरोधकांनी सरकारला अनेकवेळा कोंडीत पकडल्यावर खुद्द पंतप्रधान मोदींनी या वाचाळवीरांची कानउघडणी करण्यात आली होती तसच त्यांना लक्ष्मणरेषा न ओलांडण्याचा सल्लाही देण्यात आला होता. मात्र तरीही ही विधाने सुरूच राहिल्याने मोदींनी निर्वाणीचे अस्त्र उपसले असून वादग्रस्त विधाने न थांबवल्यास आपण पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊ असा इशारा त्यांनी दिला असल्याची माहिती समोर येत आहे.
साध्वी निरंजन ज्योती, साक्षी महाराज यांचे वक्तव्य, तसेच आग्र्यातील सामूहिक धर्मांतर या व अशा अनेक मुद्यांवरून विरोधकांनी गदारोळ माजवत नेत्यांच्या वक्तव्यांवर पंतप्रधान मोदींनी स्पष्टीकरण अशी मागणी करत संसदेचे कामकाज ठप्प पाडले होते. भाजपा सरकारवर अनेकवेळा टीकास्त्रही सोडण्यात आले. या सर्वांमुळे हैराण झालेल्या मोदींनी राजीनाम्याचे अस्त्र बाहेर काढले आहे. मोदींनी स्पष्ट शब्दांत नाराजी नोंदवली असून पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काही कडक पाऊले उचलत असल्याचे सूत्रांकडून समजत आहे