आमदारांनीच रोखली एसी प्रवासासाठी रेल्वे

0
9

नागपूर – ‘भारतीय रेल्वे आपकी सेवा में’ असे ब्रीद घेऊन धावणा-या रेल्वेला दस्तुरखुद्द आमदार महोदयांच्याच सेवेचा विसर पडला. म्हणूनच की काय शुक्रवारी रात्री नागपूरहून सुटणा-या सेवाग्राम एक्स्प्रेसला आमदारांसाठीची ‘एसी टू टियर’ विशेष बोगी न जोडता ३५ पैकी १७ आमदारांची स्लीपर कोचमध्ये व्यवस्था करण्यात आली. उर्वरित आमदारांनाही अन्यत्र जागा देण्यात आली. यामुळे संतप्त लोकप्रतिनिधींनी नागपूर स्थानकातून निघालेली रेल्वे साखळी ओढून तीन वेळा थांबविली. गाडीत बसलेल्या दोन मंत्र्यांनीही तोंडावर बोट ठेवत आमदारांच्या आंदोलनाला जणू पाठिंबाच दर्शविला. आमदारांच्या या आंदोलनामुळे रेल्वेतील शेकडो प्रवासी मात्र सुमारे ४० मिनिटे अक्षरश: वेठीस धरले होते.

विधिमंडळ अधिवेशन काळातील सुटीसाठी नागपूरहून घरी जाणा-या आमदारांसाठी ‘एसी टू टियर’च्या खास बोगीची खास व्यवस्था करण्यात येते. नागपूरहून रात्री ८.५० वाजता सुटणा-या सेवाग्राम एक्स्प्रेसलाही ही बोगी जोडण्यात येणार होती. त्यादृष्टीने प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, योगेश घोलप, नरहरी झिरवाळ, अनिल कदम, उन्मेष पाटील आदींसह ३५ आमदारांना या ‘टू टियर’ची तिकिटे देण्यात आली होती. परंतु, शुक्रवारी सेवाग्रामच्या रेकमध्ये या बोगीचा पत्ताच नसल्याने आमदारांचा पारा चढला. आम्हाला ‘टू टियर’चे तिकीट देऊन स्लीपर कोचमध्ये बसविण्याची हिंमतच कशी झाली?’, असा सवाल करत आमदारांनी रेल्वेच्या अधिका-यांना धारेवर धरले. परंतु, या अधिका-यांनीही असमर्थता दर्शविल्याने ‘जोपर्यंत सेवाग्राम एक्स्प्रेसला विशेष बोगी जोडण्यात येणार नाही, तोपर्यंत रेल्वे हलूच देणार नाही’, असा पवित्रा आमदारांनी घेतला. दुसरीकडे रेल्वेलाही उशीर होत असल्याने प्रवाशांमध्ये संताप वाढत होता. त्यामुळे रात्री ९.२० च्या सुमारास रेल्वे सुरू झाली, मात्र आमदारांनी साखळी ओढून ती थांबविली. असा प्रकार तीन वेळा झाला. रेल्वेत असलेले गिरीश महाजन आणि दादा भुसे या मंत्र्यांनीही मौन बाळगत आमदारांच्या आंदोलनाला जणू मूक संमतीच दिली. अखेर नमते घेत आमदारांनी अन्य वातानुकूलित कक्षात सीटची ‘अ‍ॅडजेस्टमेंट’ करून घेतली. परंतु, या गोंधळात ४० मिनिटे गेली. या काळात प्रवासी संतापले होते, मात्र हतबलतेने पाहण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता.

सारे काही गुजरातला?
‘सेवाग्राम’ला जोडली जाणारी बोगी कोठे गेली, असा सवाल आमदारांनी रेल्वे अधिका-यांना केला, तेव्हा अहमदाबाद एक्स्प्रेसला ती जोडली असल्याचे कळाले. ‘सारे काही गुजरातलाच न्यायचे का?’, असा सवाल करीत आमदारांनी राग व्यक्त केला. परंतु, त्यातील सत्ताधा-यांनी ‘आपलेच दात आणि आपलेच ओठ’ म्हणत या विषयाला बगल दिली.

गोंधळाचा दुसरा अंक
गेल्या शुक्रवारीदेखील काही आमदारांना ‘टू टियर’ची तिकिटे देऊन थ्री टियरमध्ये बसविण्यात आले होते. परंतु, त्या वेळी प्रवास करणा-या मंत्र्यांची संख्या अचानक वाढल्याने त्यांची व्यवस्था ‘टू टियर’मध्ये करून अन्य आमदारांना थ्री टियरमध्ये हलविण्यात आले होते.

सवलतीचा फायदा मिळायलाच हवा
शासनाने दिलेल्या रेल्वे सवलतीचा फायदा आमदारांना मिळणे गरजेचेच आहे. आम्ही म्हणत नाही की, दुस-यांच्या जागा आम्हाला द्या. परंतु, आमच्या हक्काच्या जागा तर आम्हाला मिळाव्यात. राहुल आहेर, आमदार, चांदवड, देवळा