भास्कर जाधवांनी केला विदर्भातील शेतकर्याचा अपमान

0
11

नागपूर – कोकणातही गरीब लोक राहतात. मात्र ते आपल्या दारिद्रय़ाचे प्रदर्शन करत नाहीत. अर्ध्र्यापोटी राहूनही हिम्मत हरत नाही. मग विदर्भातील शेतकरीच का आत्महत्या करतात, यासह आणखी काही आक्षेपार्ह विधाने करणा-या भास्कर जाधव यांच्यावर विदर्भातील आमदार संतापले.
विदर्भातील शेतक-यांना दिलासा देणा-या चर्चेत त्यांना हिणवणा-या जाधव यांनी आपले शब्द मागे घ्यावेत, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली. अखेर जाधव यांना आपले शब्द मागे घ्यावे लागले.
काँग्रेसचे विजय वडेट्टीवार म्हणाले, ‘आपण नागपूर येथे अधिवेशन घेतले आहे, ते विदर्भातील माणसाला न्याय देण्यासाठी घेतले आहे. इथे भास्कर जाधव यांनी वापरलेली भाषा ही विदर्भातील माणसाला न्याय देण्यासाठी नव्हे, तर त्यांची टिंगलटवाळी करण्यासाठी केली आहे, असे दिसून येते’, असे वडेट्टीवार म्हणाले.
नियम २९३ अन्वये दिलीप वळसे-पाटील यांनी विदर्भातील प्रश्नांवर मांडलेल्या प्रस्तावावर बोलताना जाधव यांचा तोल सुटला आणि सत्ताधारी व विरोधी बाकांवरील आमदार संतापले. जाधव म्हणाले, ‘महाराष्ट्रातील इतर भागांना जितकी वीज मिळते तितकीच वीज विदर्भाला मिळते, सोयीसुविधा सारख्याच मिळतात.
मग इथले शेतकरी का आत्महत्या करतात. आमच्या कोकणातील लोक गरीब आहेत. मात्र ते आपल्या गरिबीचे प्रदर्शन करत नाहीत. कितीही संकटे आली तरीही मदतीची अपेक्षा करत नाहीत. आमच्याकडे फयाण आले, दरवर्षी अतिवृष्टी होते. ते कधी मदत मागत नाहीत. विदर्भात दर वर्षीच हाच मुद्दा का उपस्थितीत होतो’’, असे जाधव म्हणाले. त्यावर दोन्ही बाकांवरील विदर्भातील आमदार संतापले.
तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जाधव यांच्या भाषणाबद्दल नाराजी व्यक्त केली. विदर्भातील शेतकरी आपल्याला काही मिळेल या आशेने सभागृहाकडे पाहात असताना त्यांच्या मनात हिंमत निर्माण करण्याची गरज असताना जाधव यांनी वापरलेले शब्द योग्य नाहीत. त्यांनी शब्द मागे घ्यावेत, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. अखेर जाधव यांनी आपले शब्द मागे घेतले.