बंगळूर बॉंबस्फोट हा दहशतवादी हल्ला

0
11

नवी दिल्ली – बंगळूरमधील बॉंबस्फोट हा दहशतवादी हल्लाच असून या घटनेच्या तपासाची सूत्रे लवकरच राष्ट्रीय तपास पथकाकडे (एनआयए) सोपविली जाऊ शकतात. याशिवाय भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत म्हणून महत्त्वाच्या भागांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे निर्देशही केंद्राने राज्य सरकारला दिले आहेत.

रविवारी येथे झालेल्या कमी तीव्रतेच्या बॉंबस्फोटामध्ये एक महिला मरण पावली होती, तर अन्य दोघेजण जखमी झाले होते. या घटनेनंतर केंद्र
सरकारने युद्धपातळीवर उपाय योजना आखायला सुरवात केली असून, याबाबत बोलताना केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह म्हणाले की, योग्य चौकशी झाल्यानंतरच या स्फोटामागे नेमका कोणाचा हात आहे हे स्पष्ट होऊ शकेल. केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिज्जू यांनी देखील हा बॉंबस्फोट दहशतवादी हल्लाच असल्याचे म्हटले आहे. या घटनेची चौकशी सुरू असल्याने त्यावर आताच भाष्य करता येणे शक्‍य नसल्याचेही रिज्जू यांनी नमूद केले. या स्फोटानंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी कर्नाटक सरकारला सर्वतोपरी मदत करण्याची तयारी दर्शविली असून, आवश्‍यकता वाटल्यास या घटनेचा तपास “एनआयए‘कडे दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले. स्फोटांचा सविस्तर अभ्यास करण्यासाठी केंद्रीय पथक बंगळूरमध्ये दाखल झाले असून, ते स्थानिक पोलिसांना मदत करेल. स्वतः गृहमंत्री राजनाथसिंह आसाम आणि कर्नाटकातील स्थितीवर लक्ष ठेवून आहेत. याअनुषंगाने त्यांनी कायदामंत्री सदानंद गौडा, रसायनमंत्री अनंत कुमार यांच्याशी चर्चा केल्याचे समजते.

बंदोबस्तात वाढ
बंगळूरमधील बॉंबस्फोटानंतर राज्य सरकार खडबडून जागे झाले असून, संवेदनशील भागांमध्ये “सीसीटीव्ही कॅमेरे‘ लावण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही आज राज्यातील स्थितीची माहिती घेतली. अशा प्रकारच्या घटना भविष्यामध्ये घडू नयेत म्हणून वेगळ्या पथकाची निर्मिती केली जाणार असून, सायबर सुरक्षेमध्येही वाढ करण्यात येणार आहे. या स्फोटाच्या अनुषंगाने सर्व पैलूंचा अभ्यास करण्यात येणार असून “सिमी‘च्या सहभागाची शक्‍यताही पडताळून पाहण्यात येत आहे. या चौकशीमध्ये “एनआयए‘चे पथक स्थानिक पोलिसांना मदत करेल.