एसटी प्रवाशांसाठी 5 लाखांचा विमा, परिवहनमंत्री दिवाकर रावतें

0
21

मुंबई: राज्यातील एसटीने प्रवास करणाऱ्यांसाठी आता पाच लाखांचा अपघाती विमा असणार आहे. राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी परिवहन खात्याचे धोरण आज जाहीर केले. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

याशिवाय राज्यातील परिवहन खात्याच्या सर्व बीओटी प्रकल्पांना स्थगिती देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसंच खासगी वाहनांना देण्यात येणाऱ्या टप्पा वाहतूकीच्या केंद्राच्या प्रस्तावासही राज्य सरकार विरोध करणार असल्याचं रावते यांनी स्पष्ट केलं.

एसटीच्या इंधन वापराबाबतही त्यांनी आपले धोरण स्पष्ट केले आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या पट्ट्यात एसटी इथेनॉलवर धावणार असून मुंबई-पुणे भागात ती सीएनजीवर धावणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देत, राष्ट्रवादी प्रणित संचालक मंडळ बरखास्त करण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. तसंच लवकरात लवकर एसटीला टोलच्या जाचातून मुक्त करणार असल्यांचंही त्यांनी दिवाकर रावते यांनी स्पष्ट केलं.

नव्या परिवहन मंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक घोषणा केली आहे. शेतकऱ्यांच्या मालाची ने-आन करण्यासाठी नव्या गाड्यांची योजना करणार असल्याचं रावते यांनी सांगितलं.

नव्या परिवहन मंत्र्यांच्या धोरणामुळे आजच्या स्पर्धात्मक युगात तरी एसटी महामंडळ कात टाकणार का हे पाहाणं महत्वाचं ठरणार आहे.