मुंबई : हिंदुत्त्ववादी संघटनांच्या विरोधामुळे वादात अडकलेल्या ‘पीके’ चित्रपटावर बंदी घालण्यात कोणताही अर्थ नसल्याची प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते आज मुंबईत बोलत होते.
‘पीके’ चित्रपटाला या आधीच सेन्सॉर बोर्डाने परवानगी दिली आहे. सिनेमाविरोधात कोर्टात याचिकाही दाखल झाल्या आहेत. पण कोर्टाने सिनेमाच्या स्क्रीनिंगसंदर्भात राज्य सरकारला कोणतेही आदेश दिले नाहीत. त्यामुळे सिनेमाचे शो नीट पार पडले पाहिजेत याची काळजी सरकार घेईल, असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
देशभरात हिंदुत्त्ववादी संघटनांनी ‘पीके’ चित्रपटाला विरोध सुरु केला आहे. खुद्द सरसंघचालक मोहन भागवत यांनीही कालच ‘पीके’ चित्रपटाला विरोध केला. त्यामुळे राज्यात असलेल्या भाजप सरकारच्या भूमिकेकडे लोकांचं लक्ष लागलं होतं.
मात्र संघाच्या जवळचे मानले जाणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र ‘पीके’ चित्रपटावर कोणतीही बंदी घालणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.