पाकिस्तानकडून १५ भारतीय चौक्यांवर गोळीबार

0
8

नवी दिल्ली -पाकिस्तानी सैन्याने बुधवारी रात्री जम्मू-काश्मीरमधील आंतरराष्ट्रीय सीमेवरील १५ भारतीय चौक्यांवर जोरदार गोळीबार केला. पाकिस्तानी सैन्याने सांबा आणि हरिनगर सेक्टरमधील १५ चौक्यांना लक्ष्य केले.
बुधवारी सकाळी पाकिस्तानी सैन्याने सांबा जिल्ह्यातील सीमा सुरक्षा दलावर गोळीबार केला होता. यामध्ये एक जवान शहीद झाला तर एक जवान जखमी झाला होता.
यानंतर रात्री पुन्हा एकदा पाकिस्तानी सैन्याने सांबा सेक्टरमधील भारतीय चौक्यांवर गोळीबार केला. भारतीय चौक्यांसोबत त्यांनी सीमेवरील गावांनाही लक्ष्य केले. गेल्या ३६ तासांतील ही तिसरी घटना आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानच्या दिशेने बुधवारी रात्रभर गोळीबार सुरु होता. यामध्ये एक नागरिक जखमी झाला आहे.
वारंवार शस्त्रसंधी कऱणा-या पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर द्या असे आदेश दिल्यानंतर भारतीय सैन्यानेही पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. यामध्ये पाकिस्तानचे चार जवान ठार झाले होते. दरम्यान, या बुधवारी घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारताचे पाकिस्तानातील सहउच्चायुक्त जे.पी.सिंग यांना समन्स बजावले तसेच भारताचा निषेध नोंदवला.