गोंदिया :केंद्र सरकार आजपासून घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरचे अनुदान थेट बँक खात्यात जमा करण्यास सुरुवात करणार आहे. त्यामुळे आता ग्राहकाला सिलेंडर बाजारभावाने खरेदी करावा लागणार आहे. दरम्यान, सिलेंडर 50 रुपयांनी महागला आहे.
राज्यातल्या 34 जिल्ह्यांमधल्या सुमारे 2 कोटी ग्राहकांना ही नवी योजना लागू होणार आहे. ज्या ग्राहकांना या योजनेत सहभागी व्हायचे असेल त्यांनी आपल्या बँक खात्याशी आधार क्रमांक अथवा एलपीजी ग्राहक क्रमांक संलग्न करावा लागणार आहे. आधार कार्ड नसलेले ग्राहक सतरा अंकी एलपीजी ग्राहक क्रमांक थेट बँक खात्याशी जोडू शकतात.
ग्राहकाने सिलेंडरची नोंदणी केल्यानंतर लगेचच 568 रुपये अंशदान थेट खात्यात जमा होईल. त्याने प्रत्यक्ष सिलेंडर घेतल्यानंतर पुढील अनुदानही त्याचवेळी जमा होईल. 31 मार्चपर्यंत तुम्ही योजनेत सहभागी झाला नाहीत, तरी सवलतीच्या दरात घरपोच सिलिंडर मिळेल. पण जर तुम्ही 1 एप्रिलनंतरही सहभागी झाला नाहीत, तर तुम्हाला बाजारभावानेच सिलेंडर विकत घ्यावे लागेल.