मुंबई- भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी जालन्याचे खासदार व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची निवड आज करण्यात आली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत झालेल्या पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, दानवे यांच्या नावाची अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. अमित शहा दोन-तीन दिवसात दानवेंचे नाव जाहीर करतील.
पक्षाध्यक्ष अमित शहा आज मुंबईत आहेत. आज सकाळी झालेल्या बैठकीस शहा यांच्यासह रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. त्यात हा निर्णय घेण्यात आला.
गोपीनाथ मुंडे यांच्या गटाचे मानले जाणारे दानवे यांनी अलीकडच्या काळात नितीन गडकरी यांच्याशी जुळवून घेतले आहे. त्यामुळेच त्यांच्या नावाला पसंती मिळाल्याचे कळते आहे. दानवे लवकरच केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा देऊन प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी हाती घेतील असे कळते आहे. राज्य सरकारचा पुढील आठवड्यात विस्तार होत आहे. त्यात 10-12 मंत्री शपथ घेत आहेत. तसेच केंद्रीय मंत्रिमंडळाचा छोटेखानी विस्तार होईल. यात दानवेंच्या जागी विनय सहस्त्रबुद्धे यांच्यासह शिवसेनेचे अनिल देसाई शपथ घेतील असे कळते आहे. भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष असलेले सहस्त्रबुद्धे यांना मुरली देवरांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर राज्यसभेत पाठवले जाणार आहे.
प्रदेशाध्यक्षपदी रावसाहेब दानवे यांच्यासह आशिष शेलार व सुजितसिंह ठाकूर यांचे नाव चर्चेत होते. मुंबईपुरते मर्यादित असलेल्या शेलार यांची ग्रामीण महाराष्ट्रात फारशी ओळख नाही. त्याचा पक्षाला तोटा होण्याची भीती व्यक्त करण्यात आली. शेलारांना आता राज्य सरकारमध्ये कॅबिनेट खाते मिळण्याची शक्यता आहे. तर, सुजितसिंह ठाकूरांच्या नावाला गडकरी गटाकडून विरोध झाला. त्यामुळे केंद्रात अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री असलेले दानवेंच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याचे आल्याचे स्पष्ट झाले आहे.