पारपत्राच्या नूतनीकरणासंबंधी परराष्ट्र मंत्रालयाकडून मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

0
9

पुणे-हस्तलिखित स्वरूपातील, छायाचित्रे चिकटवलेली पारपत्रे, नूतनीकरणाची तारीख सहा महिन्यांवर आलेली पारपत्रे, तसेच बुकलेटमधील पाने संपत आलेली पारपत्रे बाळगणाऱ्या नागरिकांना आपल्या पारपत्रांचे नूतनीकरण प्राधान्याने करून घ्यावे लागणार आहे. नजीकच्या काळात परदेशी प्रवासाची शक्यता असणाऱ्यांसाठी परराष्ट्र मंत्रालयाने २३ डिसेंबरला काही मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत.
परदेशी प्रवास करू इच्छिणाऱ्या नागरिकांनी केवळ पारपत्र काढून न थांबता त्याच्या नूतनीकरणाकडेही लक्ष देणे गरजेचे आहे, याकडे मंत्रालयाने लक्ष वेधले आहे. ‘इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशन’ने (आयसीएओ) मशिनद्वारे वाचता न येणाऱ्या पारपत्रांच्या नूतनीकरणासाठी २४ नोव्हेंबर २०१५ ही अंतिम तारीख ठरवून दिली आहे. त्यामुळे हस्तलिखित स्वरूपात असलेली आणि फोटो चिकटवलेली पारपत्रे या मुदतीनंतर चालणार नाहीत. मशिनद्वारे न वाचता येणारे पारपत्र बाळगणाऱ्या नागरिकांना २५ नोव्हेंबर २०१५ पासून परदेशी जाऊ इच्छिणाऱ्या पण व्हिसा नाकारला जाण्याची शक्यता आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने २००१ सालापासून मशीनद्वारे वाचता येणाऱ्या पारपत्रांचे वाटप सुरू केले.
विशेषत: १९९० च्या शेवटी ज्यांनी पारपत्र काढले आहे आणि त्यांच्या पारपत्रावर वीस वर्षांची मुदत (व्हॅलिडिटी) नमूद करण्यात आली आहे अशांना आता पारपत्राचे नूतनीकरण करून घ्यावे लागणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार नोव्हेंबर २०१४ अखेर देशात मशीनद्वारे वाचता न येणारे पारपत्र बाळगणारे २ लाख ८६ हजार नागरिक आहेत.
पारपत्राच्या नूतनीकरणाची तारीख सहा महिन्यांवर आली असेल तरी त्या तारखेसाठी न थांबता पुढच्या परदेश प्रवासाच्या आधी त्वरित नूतनीकरण करून घ्यावे लागणार आहे. पारपत्राची व्हॅलिडिटी सहा महिन्यांनी संपणार असली तरीही त्या व्यक्तीला काही देशांकडून व्हिसा नाकारला जाऊ शकतो, असे मंत्रालयाने सूचित केले आहे. लहान मुलांच्या पारपत्रांना पाचच वर्षांची व्हॅलिडिटी दिली जात असल्यामुळे त्यांच्या पारपत्रांच्या नूतनीकरणाची वेळीच काळजी घ्यावी, अशी सूचनाही देण्यात आली आहे.
पारपत्राची पाने संपत आली आहेत का, याकडेही काटेकोरपणे लक्ष ठेवावे लागणार आहे. काही देशांमध्ये २ पानांपेक्षा कमी पाने असलेली पारपत्रे स्वीकारली जात नाहीत. पारपत्रातील व्हिसाची पाने संपत आली असतील तर त्यासाठी पुरवणी पाने जोडण्याची व्यवस्था नसल्यामुळे अशा नागरिकांना पारपत्राचे नूतनीकरणच करून घ्यावे लागेल, असेही मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
नूतनीकरणाकडे दुर्लक्ष झाल्यास नागरिकांना कटकटच!
प्रादेशिक पारपत्र अधिकारी अतुल गोतसुर्वे म्हणाले, ”पारपत्रावरील व्हॅलिडिटी संपण्यासाठी सहा महिन्यांपेक्षा कमी अवधी उरला असेल तर बरेच देश व्हिसा नाकारण्याची शक्यता असते. काही देश अशा व्यक्तीला विमानतळावर अडवू शकतात, काही जणांच्या बाबतीत संबंधित देशाच्या विमानतळावरून परत मायदेशी पाठवले जाण्याचीही शक्यता असते. हा त्रास टाळण्यासाठी वेळीच पारपत्राचे नूतनीकरण करून घ्यावे. पारपत्रात एखादेच पान उरले असेल तर काही राजदूत कार्यालये व्हिसा देत नाहीत.”
पारपत्राचे नूतनीकरण करण्यासाठी ६६६.स्र्ं२२स्र्१३्रल्ल्िरं.ॠ५.्रल्ल या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करून ऑनलाईन शुल्क भरावे लागते. संकेतस्थळावरून दिल्या गेलेल्या भेटीच्या वेळेवर पारपत्र कार्यालयात आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात. नव्याने पोलिस चौकशीची गरज नसल्यास त्या नागरिकाला त्वरित नूतनीकरून करून मिळते.