जम्मू : पाकिस्तानने नववर्षात कुरापती सुरूच ठेवल्या असून गृहमंत्री राजनाथसिंग यांच्या आदेशानुसार सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी(बीएसएफ) चोख प्रत्युत्तर देत पाच पाकिस्तानी रेंजर्सना कंठस्नान घातले.
जम्मू-काश्मीरच्या सांबा आणि कठुआ जिल्’ात बीएसएफच्या आठ चौक्यांना लक्ष्य बनवत पाकिस्तानने शुक्रवारी जोरदार गोळीबार व तोफगोळ्यांचा मारा केल्यानंतर तणाव निर्माण झाला. गुरूवारपासून चकमकी झडत असून भारतीय जवानांनी केलेल्या गोळीबारात पाच पाकिस्तानी रेंजर्स ठार झाल्याच्या वृत्ताला रात्री उशिरा दुजोरा देण्यात आला. गेल्या चार दिवसांत पाकने लागोपाठ चौथ्यांदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. गृहमंत्री राजनाथसिंग यांनी बीएसएफच्या जवानांना चोख प्रत्युत्तर देण्याचा आदेश दिला आहे.
सीमेवर पाकिस्तानी रेंजर्सचा गोळीबार
गेल्या चार दिवसांपासून पाकिस्तानच्या बाजूने सीमेवर कुरापती चालूच असून शुक्रवारी रात्री पाकिस्तानी रेंजर्सनी जम्मू विभागातील आंतरराष्ट्रीय सीमेलगतच्या सांबा, कथुआ भागातील भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या आठ चौक्यांवर उखळी तोफांंच्या माऱ्यासह गोळीबार केला.
पाकिस्तानच्या बाजूने गेल्या चार दिवसांपासून भारतीय हद्दीत गोळीबार होत असल्याने गृहमंत्री राजनाथसिंह यांनी सीमा सुरक्षा दलाला योग्य कारवाई करण्याचे आदेश दिले. शुक्रवारी रात्री ९.३५ सांबा आणि कथुआतील रिगल, चल्लीयारी, सुचेतगढसह सीमा सुरक्षा दलाच्या ८ चौक्यांवर गोळीबार केला. सीमेपलीकडील रझाब शीद, असिफ शीद, चक भुरा, न्यू पाक आणि धनधर चौकीवरून पाकिस्तानी रेंजर्सनी उखळी तोफांच्या माऱ्यासह गोळीबार केला.