नागपूर,दि.01-राज्यातील बहुचर्चित गोसेखुर्द सिंचन प्रकल्प घोटाळ्याप्रकरणी लाच प्रतिबंधक पथकाद्वारे आणखी दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून रविवारी एकाच दिवशी नागपूर, मुंबई, औरंगाबाद, पुणे, नाशिक, हैदराबाद, तिरुपती, दिल्लीसह १५ ठिकाणी धाडी टाकून आरोपींच्या घराची व प्रतिष्ठानांची झाडाझडती घेण्यात आली. यामुळे सिंचन विभागातील ठेकेदारांचे धाबे दणाणले आहे. अँन्टिकरप्शन ब्युरो नागपूरचे पोलीस अधीक्षक संजय दराडे यांची येथून बदली होताच सदर दोन गुन्हे दाखल करण्यात आले, हे येथे उल्लेखनीय.या प्रकरणी आंध्र प्रदेशच्या टीडीपीचे आमदार डी. व्ही. रामाराम यांच्यासह १३ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
गोसेखुर्द सिंचन प्रकल्पाच्या नेरला (पाघोरा) उपसा योजनेच्या पेंढरी शाखा कालव्याच्या कामात १५ कोटी ४९ लाख १९ हजार रुपये व घोडाझरी शाखा कालव्याच्या कामात ७ कोटी ८१ लाख ३९ हजार रुपये असा एकूण १३ कोटी ३0 लाखांचा घोटाळा झाल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले. यावरून वरील दोन गुन्हे रविवारी सदर येथे दाखल करण्यात आले.राज्यात गाजलेल्या बहुचर्चित गोसेखुर्द सिंचन योजनेच्या कोट्यवधीच्या घोटाळ्याप्रकरणी महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाच्या आदेशानुसार लाच प्रतिबंधक पथक ३ हजार ६00 कोटींच्या ४0 कंत्राटाची चौकशी करीत आहे.या प्रकरणी यापूर्वी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आणि नव्याने दोन असे एकूण चार गुन्हे दाखल झाले असून ३६ कंत्राटांची चौकशी बाकी आहे. गोसेखुर्द प्रकल्पातील पेंढरी शाखेत उपसा सिंचन योजनेंतर्गत कालव्याचे बांधकाम आणि मातीकामासाठी (८.५२ ते ४३.८० कि.मी.) २००६ मध्ये विदर्भ सिंचन विकास महामंडळाने (व्हीआयडीसी) निविदा काढल्या होत्या. या निविदा प्रक्रियेत तीन कंपन्या सहभागी झाल्या होत्या. यात श्रीनिवासन कन्स्ट्रक्शन कंपनी आणि आर. बलरामी रेड्डी अॅन्ड कंपनीला कंत्राट मिळाले. या कामात मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाल्याने एसीबीने चौकशी सुरू केली.
या चौकशीच्या आधारावर एसीबीने मे. श्रीनिवासा कन्स्ट्रक्शनचे मालक टीडीपीचे आमदार बी. व्ही. रामाराव रा. मंगलम् रोड तिरुपती, मे. आर. बालारामी रेड्डी अॅन्ड कंपनीचे मॅनेजिंग पार्टनर रामी रेड्डी, श्रीनिवासुला रेड्डी, बंजारा हिल्स, तेलंगणा, व्हीआयडीसीचे तत्कालीन कार्यकारी अभियंता प्रभाकर विठ्ठलराव मोरघडे रा. इसान टॉवर, शिवाजीनगर, तत्कालीन वरिष्ठ विभागीय लेखापाल श्याम जगदीश आंबुलकर रा. राधाकृष्ण अपार्टमेंट हुडकेश्वर, तत्कालीन अधीक्षक अभियंता दिलीप दीपराव पोहेकर, रा. पडोळे ले-आऊट परसोडी, तत्कालीन मुख्य अभियंता सोपान रामराव सूर्यवंशी, रा. सहकरनगर औरंगाबाद आणि तत्कालीन कार्यकारी संचालक रोहिदास मारुती लांडगे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.एसीबीने रविवारी या प्रकरणात मुंबईसह १५ ठिकाणी छापे टाकले.





