विशेष प्रतिनिधी
हैदराबाद: आंध्रप्रदेशमध्ये सेसाचलमच्या जंगलात उडणारा साप पाहायला मिळाला आहे. उडणाऱ्या सापाची ही जात श्रीलंकेत आढळते. मात्र आता तो आंध्रप्रदेशात आढळून आल्याची माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली.
प्राणी संशोधकांनी सांगितल्याप्रमाणे, क्रिसोपेलिया जातीचा हा साप पहिल्यांदा श्रीलंकेत आढळून आला होता. तेथील शुष्क प्रदेश आणि मध्यम जलवायू असलेल्या भागात आढळणारा हा साप आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्याच्या सेसाचलमध्ये आढळून आला आहे.
तिरूपतीपासून 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या वनक्षेत्रात हा उडणारा साप आढळून आला होता. मात्र अनेक परिक्षण केल्यानंतर हा साप क्रिसोपेलिया टैप्राबानिक प्रजातीचा असल्याचं बोललं जात आहे.
जैवविविधता क्षेत्रातील घडामोडींवर शोध पत्रकारिता करणाऱ्या ‘चेकलिस्ट’ या वार्षिक अंकात ही माहिती देण्यात आली आहे. हा साप सेसाचलमच्या वनात एक वर्षापूर्वी आढळून आला होता. मात्र त्यावर मोठ्या संशोधनानंतर हा साप उडणारा साप असल्याचं संशोधनातून पुढे आलं आहे.
वन्यजीव संरक्षक रविकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली बुबेश गुप्ता आणि एन. वी. शिवराम प्रसाद यांनी लंडनच्या ‘द नॅचरल हिस्ट्री म्युजीअम’मध्ये कार्यरत असणाऱ्या साइमन टी मॅडॉक यांच्यासोबत हे संशोधन केले आहे. याशिवाय बेंगलुरू येथील भारतीय विज्ञान संस्थेच्या अध्ययन केंद्रात कार्यरत असलेले वी. दिपक यांचीही या संशोधनात मदत झाली आहे.