बीड – भगवानबाबा समाधी दर्शनासाठी आलेले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंयज मुंडे यांना हुल्लडबाज कार्यकर्त्यांनी विरोध केल्यामुळे त्यांना दर्शनाविणाच परतावे लागले आहे. त्यांच्या गाडीवर दगडफेक देखील करण्यात आल्याचे वृत्त आहे. हुल्लडबाजी करणारे लोक राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे समर्थक असल्याचे सांगण्यात येत आहे.
श्री क्षेत्र भगवानगडावर भगवानबाबा समाधी सुवर्ण महोत्सव सप्ताह सुरु आहे. मंगळवारी या सप्ताहाची सांगता होत आहे. यानिमीत्ताने विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे सोमवारी सकाळी समाधी दर्शनासाठी आले होते. मात्र, येथे उपस्थित कार्यकर्त्यांनी त्यांना गडावर जाण्यापासून रोखण्यासाठी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली. त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या सर्व प्रकाराने भगवानगडावरील वातावरण बदलून गेले. गडाचे विश्वस्त नामदेव शास्त्री यांनी हुल्लडबाजांना शांततेचे आवाहन केले. अशा वागणूकीमुळे गडाची बदनामी होईल असे बजावल्यानंतरही धनंजय मुंडे विरोधक शांत झाले नाही. त्यांनी हुल्लडबाजी सुरुच ठेवली. या प्रकारामुळे नाराज झालेले धनंजय मुंडे समाधीचे दर्शन न घेताच आल्या पावली परत गेले.
धनंजय मुंडे हे दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे आहेत. मुंडेच्या हयातीतच त्यांनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसची कास धरली होती. गेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना मुंडेची कन्या पंकजा यांच्याविरोधात परळी येथून उमेदवारी दिली होती. मात्र त्यात त्यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला. असे असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी धनंजय यांना विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेतेपद दिले आहे.
हल्ला पूर्वनियोजीत – धनंजय मुंडे
हल्ला पूर्वनियोजीत असलाचे धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे. ते म्हणाले, ज्या-ज्या वेळी माझ्यावर नवी जबाबदारी येते तेव्हा मी भगवान गडावर जाऊन समाधीचे दर्शन घेतो. आज सकाळी मी गडाच्या दिशेने निघालो असताना ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत झाले. मात्र, भगवानगडाच्या परिसरात प्रवेश केल्यानंतर काही मोजक्या लोकांनी गाडीच्या ताफ्याच्या दिशेने दगडफेक केली.’
हा प्रकार निंदनीय असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, उद्या समाधी सुवर्ण महोत्सव सोहळा सप्ताहाची सांगता आहे. त्यासाठी राज्याचे अनेक मंत्री आणि विधानसभा विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनाही निमंत्रण दिले गेले. मात्र मला निमंत्रण दिले गेले नाही. या राजकारणात न जाता मी आज दर्शनासाठी गेलो असताना झालेला हा प्रकार निंदनीय आहे.