गांधीनगर : राज्य शासन व जनता तसेच अनिवासी भारतीयांशी थेट संपर्क साधता यावा तसेच त्यांच्या मागण्या आणि सूचना यांची दखल घेता यावी यासाठी राज्य शासनातर्फे 26 जानेवारीपासून “आपले सरकार” हे वेब पोर्टल सुरू करण्यात येत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. प्रवासी भारतीय दिवसाच्या अखेरच्या सत्रात राज्यनिहाय झालेल्या चर्चेच्या व्यासपीठावर महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी उत्सुक असलेल्या अनिवासी भारतीयांशी ते बोलत होते.
“महाराष्ट्रात झालेल्या राजकीय बदलानंतर आमच्या अपेक्षा वाढल्या असून आपल्यासारख्या तरुण व आधुनिकतेचा ध्यास असलेल्या मुख्यमंत्र्यांकडे राज्याची धुरा आल्यामुळे संवादात अंतर राहू नये”, अशी अपेक्षा उपस्थित अनिवासी भारतीय व विदेशी गुंतवणुकदारांनी व्यक्त केली. यावर बोलताना, यापुढे आपल्याला गुंतवणुकीच्या संदर्भात थेट मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधता यावा, यासाठी “आपले सरकार” हे राज्य शासनाचे वेब पोर्टल सुरू करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांच्या हाकेला तरुणांची साद
तरुण गुंतवणूकदारांनी गर्दी केलेल्या या थेट संवादाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांसोबत अनेक प्रश्नांवर चर्चा झाली. चर्चेदरम्यानच अनेकांनी त्वरित प्रतिसाद देत गुंतवणूक व सहभागाची तयारी दाखवली. अमेरिकेच्या सेनेरिटा आयझॅक या तरुणीने आरोग्य आणि बालसंगोपन या क्षेत्रात काम करण्याची इच्छा यावेळी व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांनी त्याच ठिकाणी त्यांना राज्य शासनाच्या उपक्रमात त्वरित सहभागी होण्याची परवानगी दिली. तसेच इंग्लंडचे कॅसेलिन यांनी घनकचरा व्यवस्थापनात आपल्याला काम करण्याची इच्छा असल्याचे सांगताच मुख्यमंत्र्यांनी त्यांना नागपूरच्या मिहान प्रकल्पात काम करण्याचे निमंत्रण दिले. शिवाय दोन दिवसांनी लगेच भेटण्यासही सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या या प्रतिसादाने ही चर्चा चांगलीच रंगली.
शिकागो मध्ये स्थायिक झालेले राकेश मल्होत्रा यांनी शैक्षणिक क्षेत्रात गुंतवणुकीची इच्छा व्यक्त करताच मुख्यमंत्र्यांनी त्यांनाही भेटण्याची वेळ दिली. दुबईचे वाधवाणी यांनी भिवंडी परिसरातील रियल इस्टेटच्या व्यवसायातील समस्या कथन केल्या. त्यावर मुख्यमंत्र्यांनी महिन्याभरात तोडगा काढला जाईल, असे आश्वासन दिले. राज ढवळीकर या तरुणाने राज्यात दर्जेदार शिक्षण व त्याबाबत त्याच दर्जाची तपासणी होणे आवश्यक असल्याची अपेक्षा व्यक्त केली. त्यावर ते म्हणाले, राज्य सरकार या संदर्भात कार्यवाही करत असून अधिस्वीकृती देण्याचे धोरण शासन अवलंबवित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पर्यटन व एमआयडीसीचे सादरीकरण
प्रवासी भारतीय दिवसाच्या अखेरच्या सत्रादरम्यान पर्यटन विभाग व उद्योग विभागाने या क्षेत्रातील गुंतवणुकीच्या संधीबाबतचे सादरीकरण केले. यावेळी पर्यटन विभागाच्या सचिव वल्सा नायर-सिंह, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक आनंद रायके, पर्यटन विभागाचे संचालक सतीश सोनी उपस्थित होते. संवाद कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पर्यटन विभागाचे उपमहाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल यांनी केले.
फडणवीस यांच्याभोवती गर्दी
प्रवासी भारतीय दिवसाच्या अखेरच्या सत्रात राज्यनिहाय घडवून आणलेल्या चर्चेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सकारात्मक व निश्चयी संवादाने भारावलेल्या तरुणांनी त्यांच्याभोवती छायाचित्र काढण्यासाठी गर्दी केली. एकाचवेळी सात ठिकाणी वेगवेगळ्या राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या संवादाची प्रक्रिया सुरू होती. मात्र हॉल क्रमांक सात या महाराष्ट्र दालनात अधिक गर्दी झाली होती हे विशेष.