राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत खेळणार विदर्भाच्‍या तीन सुकन्‍या

0
15

अमरावती – अमरावतीच्या तीन महिला क्रिकेटपटू कल्याणी चावरकर, दिशा कासट आणि भारती फुलमाळी या ितघींनीही बीसीसीआयतर्फे बडोदा येथे १० ते १४ जानेवारी रोजी आयाेजित राष्ट्रीय महिला क्रिकेट स्पर्धेसाठी विदर्भ टी-२० संघात स्थान पटकावले आहे.

नुकत्याच बडोदा येथे झालेल्या मध्य विभाग एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत अमरावतीतील या महिला त्रिकुटाने विदर्भाला बाद फेरीत नेऊन ठेवण्यात सिंहाचा वाटा घेतला होता. विदर्भ महिला संघाच्या या ऐतिहासिक कामगिरीत अमरावतीच्या या तिन्ही अष्टपैलूंनी देखणी कामगिरी केली होती. मध्य विभाग स्पर्धेत कल्याणीने फिरकी मारा करत दमदार फलंदाजीच्या आधारे विदर्भाला सलग तीन विजय मिळवून दिले होते. त्याचप्रमाणे दिशा कासटनेही उपयोगी मध्यमगती गोलंदाजी फटकेबाजी करून संघाच्या विजयात योगदान दिले होते. भारती फुलमाळी ही अनुभवी क्रिकेटपटू असून गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने विदर्भाचे प्रतिनिधीत्व करीत आहे. या तिघीही अष्टपैलू खेळाडू असल्यामुळे त्या संघासाठी टी-२० स्पर्धेतही महत्त्वाची भूमिका वठवू शकतात.

बीसीसीआयतर्फे आयोजित राष्ट्रीय महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेत विदर्भाला ‘क’ गटात स्थान देण्यात आले आहे. त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

कल्याणी चावरकर, भारती फुलमाळी आणि दीशा कासट असे या तीन महिला क्रिकेटपटूंचे नाव असून त्यांनी श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या मैदानावर कारकीर्द घडवली. विशेष बाब अशी की या तिघीही अष्टपैलू खेळाडू असून संकटसमयी संघाला तारण्याची त्यांच्यात क्षमता आहे. अष्टपैलू गुणांमुळेच तसेच विदर्भ महिला संघाला त्यांची आवश्यकता असल्यामुळे व्हीसीएने त्यांची निवड केली.

तिघीही एकाच मैदानावरील खेळाडू असल्यामुळे त्यांच्यात सुरेख ताळमेळ आहे. त्याचा फायदा निश्चितपणे संघाला होईल. तिघींचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांची याआधी मध्यविभाग संघातही निवड झाली आहे. त्यामुळे त्यांच्याकडे राष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचा दांडगा अनुभवही आहे. तिघींनी आजवर दर्जेदार फटकेबाजी करून संघात आपले स्थान निश्चित केले आहे. तसेच त्यांची गोलंदाजीही वेळोवेळी संघाच्या कामी आली आहे. त्या नेहमीच प्रा. दिनानाथ नवाथे यांच्या मार्गदर्शनात सराव करीत असतात.

विदर्भाच्या संघात स्थान पटकावल्यामुळे त्यांचे जिल्हा हौशी क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष प्रभाकरराव वैद्य, उपाध्यक्ष अॅड. प्रशांत देशपांडे, महिला समिती सदस्य प्रा. माधुरी चेंडके, सचिव आणि मुख्य प्रशिक्षक प्रा. िदनानाथ नवाथे, हेमंत जाधव, सदस्य प्रा. विजय पांडे, डॉ. उदय मांजरे, प्रशिक्षक आल्हाद लोखंडे, महेश बुंधाडे, आशिष सोळंके आणि राहुल चिखलकर यांनी या तिघींचेही अभिनंदन केले आहे.