जिल्ह्यात दारूबंदी होणारच – मुनगंटीवार

0
12

उथळपेठ, चिचाळा, हळदी गाव घेतले दत्तक
मूल-मूल येथील दारूदुकान गावाबाहेर हटवा म्हणून काही नागरिकांनी मला निवेदन दिले. पण आता गावाबाहेर हटविणार नाही तर जिल्ह्याबाहेरच हटविणार आहे. काही नागरिकांनी म्हटले की वर्धा जिल्ह्यात दारूबंदी असतानाही तिथे खुलेआम दारूविक्री सुरू आहे, पण मी वध्रेचाही पालकमंत्री आहे. आता चंद्रपूरसह वध्रेचीही दारूबंदी करणार. मला दारूबंदी नव्हे तर व्यसनमुक्त समाज निर्माण करायचा आहे. समाजातील एक घटक म्हणून तुम्हीही या चळवळीत सहभागी व्हा आणि आपला गाव, तालुका कसा आदर्श करता येईल, तोपर्यंत करा म्हणजे दारूबंदीच्या विषयावर जर-तर हे प्रश्नच उपस्थित होणार नाही. जिल्ह्याची दारूबंदी होणार म्हणजे होणारच, असे आश्‍वासन राज्याचे वित्त, नियोजन, वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. येथील विविध संस्था, संघटनेच्या वतीने येथील रामलीला भवनाच्या पटांगणात आयोजित नागरी सत्काराप्रसंगी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी डॉ. राममोहन बोकारे तर प्रमुख अतिथी जि.प. अध्यक्ष संध्याताई गुरुनुले, कर्मवीर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अ. ह. वानखेडे, नगराध्यक्ष रिनाताई थेरकर, जि.प. उपाध्यक्ष कल्पना बोरकर, पं.स. उपसभापती गजानन वल्केवार, सभापती देवराव भोंगळे, न.प. उपाध्यक्ष प्रवीण मोहुर्ले,हरीष शर्मा, जिल्हा उपाध्यक्ष नंदू रणदिवे, शहराध्यक्ष प्रभाकर भोयर, चंद्रकांत आष्टणकर, अनिल साखरकर, सुनील आयलनवार आदींची उपस्थिती होती.
ना. मुनगंटीवार म्हणाले की, मतदारांनी मला दहापट मतांनी निवडून विधानसभेत पाठविले. त्यामुळे मागील कार्यकाळापेक्षा दहापट काम करावे लागणार आहे. कार्यकर्त्यांची स्वर्गरथाची मागणी पूर्ण होणार आहे. येताना ६ लाख ४0 हजार रुपये भरून आलो असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. नागरिकांची कामे एकाच ठिकाणी व्हावे यादृष्टीने मूल शहरात प्रशासकीय भवनाच्या इमारतीसाठी ७ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. केवळ डिझाईनचे काम शिल्लक असल्याचे सांगितले. मूल शहरातील बाजार, जलतरण, तलाव, क्रीडांगण, स्मशानभूमीच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. तालुक्यातील उथळपेठ या गावाने मला ८७ टक्के मतदान केले. तर चिचाळा आणि हळदी या गावाने ७६ टक्के मतदान केल्यामुळे मी या गावांना दत्तक घेत असून त्या ठिकाणी आरोग्य, वीज, सिंचन, शिक्षण यासह विविध योजनेत सहभागी करून गावाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.