दिल्लीमध्ये 7 फेब्रुवारी रोजी निवडणूक

0
9

वृत्तसंस्था
नवी दिल्ली – राजधानी दिल्लीमध्ये या क्षणापासून निवडणूक आचारसंहिता लागू झाल्याची घोषणा करत मुख्य निवडणूक आयुक्त व्ही एस संपत यांनी आज (सोमवार) राज्यातील निवडणूक वेळापत्रकाची घोषणा केली. दिल्लीमध्ये येत्या 7 फेब्रुवारी रोजी विधानसभा निवडणूक घेण्यात येणार असून, या निवडणुकीचा निकाल 10 फेब्रुवारी रोजी घोषित केला जाणार आहे.

या निवडणुकीमधील उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत 21 जानेवारी पर्यंत आहे; तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 24 जानेवारी पर्यंत आहे. दिल्लीमधील ही निवडणूक केंद्रामधील भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) सरकारसाठी अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात आहे. या निवडणुकीमध्ये भाजपला प्रामुख्याने अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचे (आप) आव्हान मिळण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे.

नव्या वर्षामधील या पहिल्या राज्य निवडणुकीसाठी प्रचार अर्थातच सुरु झाला असून, भाजपतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीमध्ये दोन दिवसांपूर्वी प्रचारसभा घेतली होती. आपतर्फे केजरीवाल यांनीही प्रचारसभा घेण्यास सुरुवात केली आहे. दिल्लीमध्ये केजरीवाल यांचे 49 दिवसांचे सरकार संपुष्टात आल्यानंतर राज्यात घटनात्मक पेच निर्माण झाला होता. या पार्श्‍वभूमीवर ही निवडणूक घोषित करण्यात आली आहे.