दरेकर, गीतेंचा भाजपप्रवेश उद्या

0
7

मुंबई-विधानसभा निवडणुकीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यापासून दुरावलेले माजी आमदार प्रवीण दरेकर आणि वसंत गीते ही जोडगोळी उद्या, मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. या दोन निष्ठावंत ‘भाऊं’नी (कार्यकर्त्यांमध्ये दोघांनाही भाऊ म्हणून ओळखलं जातं) मनसेला सोडचिठ्ठी देणं, हा राज यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातोय.

राज ठाकरे शिवसेनेत असल्यापासून प्रवीण दरेकर आणि वसंत गीते हे त्यांचे खंदे समर्थक होते. राज यांचाही या दोघांवर तितकाच विश्वास होता. या स्नेहामुळेच, राज यांनी शिवसेना सोडायचा निर्णय घेतला, तेव्हाही दरेकर आणि गीतेंनी पुढचा-मागचा विचार न करता त्यांच्यासोबत जायचं ठरवलं होतं. त्यानंतर, मनसेच्या स्थापनेपासून ते विधानसभा निवडणुकीपर्यंत त्यांची ‘राजभक्ती’ कायम होती. पण, विधानसभा निवडणुकीनंतर हे चित्र पालटलं होतं आणि आता तर, दरेकर-गीते हे दोन महत्त्वाचे डबे मनसेच्या ‘इंजिना’पासून वेगळे होत आहेत.