मोदींना दिलासा, अमेरिकेत गुजरात दंगलीसंदर्भातील खटल्याला पूर्णविराम!

0
11

पीटीआय-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधातील गुजरात दंगलीसंदर्भात न्यूयॉर्कमधील न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याला पूर्णविराम मिळाला आहे. मोदींविरोधातील खटला बंद करण्याचा आदेश न्यूयॉर्क न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांना अमेरिकेकडून गुजरात दंगलीसंदर्भात मोठा दिलासा मिळाला आहे.
नरेंद्र मोदी हे एका देशाच्या प्रमुखपदी विराजमान असल्यामुळे त्यांना सूट मिळू शकते, असे सांगत न्यूयॉर्कमधील न्यायालयाने हा खटला निकाली काढला. अमेरिकेतील मानवाधिकार संघटनेने (अमेरिका जस्टीस सेंटर) मोदींविरोधात गुजरातमध्ये २००२ साली झालेल्या दंगली संदर्भात स्थानिक न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावरील सुनावणीत न्यायाधीश एनालिझा टॉरेस यांनी तीन पानी निकाल सादर करत नरेंद्र मोदी हे एका देशाचे प्रमुख असल्यामुळे राजनैतिक अधिकाराअंतर्गत मोदींना सूट मिळू शकते, असे स्पष्टीकरण दिले. तसेच हा खटलाच बंद करण्याचे आदेश देखील टॉरेस यांनी दिले. यावेळी सुनावणी दरम्यान मानवाधिकार संघटनेच्या वतीने कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही.