गोंदिया-अभयारण्य, राखीव वनक्षेत्रातील वाघ, तसेच इतर मांसभक्षी प्राण्यांचे अस्तित्व, वावर व संख्येबाबत अंदाज, तृणभक्षी प्राण्यांची विपुलता, अधिवास क्षेत्राची गुणवत्ता व वन्यजीव क्षेत्रात मानवी हस्तक्षेप आदींची आकडेवारी उपलब्ध करण्यासाठी येत्या १५ ते २० जानेवारी दरम्यान गोंदिया जिल्ह्य़ातील नागझिरा व्याघ्र प्रकल्प, नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान येथे उद्यापासून टॉन्सेक्ट लाईन पद्धतीने वन्यप्राणी प्रगणना करण्यात येणार आहे.
गोंदिया वन्यजीव विभागाच्या अखत्यारित नवेगावबांध व नागझिरा व्याघ्र प्रकल्पासह जिल्ह्य़ातील संरक्षित वनक्षेत्राचाही भाग आहे. या दोन्ही अभयारण्यांमध्ये टॉन्सेक्ट लाईन पद्धतीने वन्यप्राणी प्रगणना करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व वनरक्षक, वनपरिक्षेत्राधिकारी, सहाय्यक उपवनसंरक्षक, उपवनसंरक्षक, तसेच वनविभाग, वन्यजीव विभागासह, एफडीसीएम विभाग आदी कामाला लागले आहेत. व्याघ्र संनियंत्रणाच्या पद्धतीत मांसभक्षी प्राण्यांच्या खाणाखुणांची नोंद घेणाऱ्या लाईन टॉन्सेक्टवरील वनस्पती, झाडोरा आच्छादन यांचा अभ्यास करणे, भूपृष्ठावरील आच्छादनाचा व तृणभक्षी खुरवर्गीय व इतर प्राण्यांच्या विष्ठेचा, लेंडय़ांच्या अभ्यास करून नोंदी घेणे ही या पद्धतीमधील मूळ संकल्पना आहे. यात सर्व नियत क्षेत्रांची माहिती एकत्रित करून त्यांचे संगणकाद्वारे विश्लेषण करून व त्या माहितीचा तज्ज्ञांकडून पुन्हा वापर करण्यात येऊन तपासणी करण्यात येणार आहे. संगणकाधारित मॉडेिलगसाठी योग्य माहितीच उपलब्ध होणे आवश्यक असल्याने सर्व क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
पहिल्या दोन दिवसात संपूर्ण सहा दिवसांच्या या कार्यक्रमात पहिले दोन दिवस पूर्वतयारी करण्यात येते. यात वनरक्षक नियत क्षेत्रातील वनाचा प्रकार, भूप्रदेशाचा प्रकार झाडोरा, अधिवासांचा अभ्यास करण्यात येतो. तसेच आवश्यकतेनुसार २ कि.मी.ची टॉन्सेक्ट लाईन टाकण्यात येते. दोन वेगळ्या अधिवासांसाठी जसे सागवान वने आणि मिश्र वने यांच्यासाठी वेगवेगळ्या लाईन टाकण्यात येतात. वनविभाग, वन्यजीव व वनविकास महामंडळाच्या कार्यक्षेत्रातील सर्व वनांमध्ये नियत क्षेत्र हे घटक म्हणून या पद्धतीने सहा दिवसात प्रगणना करावयाची आहे. यात प्रपत्र १ मध्ये वाघ, बिबट व इतर मांसभक्षी प्राण्यांच्या अस्तित्वाच्या खाणखुणांची नोंद, प्रपत्र २ मध्ये लाईन टॉन्सेक्टवर तृणभक्षी प्राण्यांची नोंद, प्रपत्र ३ अ, ब व क मध्ये वनस्पतींची, तसेच मानवी हस्तक्षेपांची नोंद प्रपत्र ४ मध्ये तृणभक्षी प्राण्यांच्या विष्ठेची नोंद अशाप्रकारे प्रगणना केली जाणार आहे. टॉन्सेक्ट लाईन पद्धतीने वन्यप्राणी प्रगणनेसाठी कर्मचाऱ्यांना त्याविषयी ३ ते ७ जानेवारीपर्यंत प्रशिक्षण देण्यात आले असल्याची माहिती वनपरिक्षेत्राधिकारी कातोरे यांनी दिली.
नागझिरा, नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानात आजपासून ‘टॉन्सेक्ट लाईन’ने प्राणीगणना
वाढदिवसाच्या शुभेच्छा