चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू – राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

0
13

मुंबई- विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने आजच्या कॅबिनेट बैठकीत घेतला. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने हा निर्णय घेण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीत मुनगंटीवार आणि भाजपने सत्तेत आल्यास चंद्रपूर जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदी करेल असे आश्वासन दिले होते. दरम्यान, वर्धा, गडचिरोली जिल्ह्यांपाठोपाठ आता विदर्भातील तिस-या जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदी झाली आहे.चंद्रपूर जिल्ह्यात पारोमिता गोस्वामी यांच्या नेतृत्वात महिलांनी सुरु केलेल्या दारुबंदी आंदोलनाला खरे यश मिळाले आहे.

शेजारच्या जिल्ह्यात दारूबंदी असल्याने चंद्रपूर जिल्ह्यात दारूची मोठ्या प्रमाणात निर्मिती होत होते. यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात आसपासच्या जिल्ह्यातील लोक दारूसाठी येत असत. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात दारूंचा धंदा फोफावला होता. त्यामुळे घरातील पुरुष मोठ्या प्रमाणात दारू पित असत. त्यामुळे या परिसरातील महिला दारूने त्रस्त होत्या तर पुरुष दारूने ग्रस्त होते. अखेर राज्य सरकारने दारूबंदीचा निर्णय घेतला आहे.

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दारूबंदीचा निर्णय झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीचा निर्णय झाल्याने आता त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करणार आहे. त्याचबरोबर अंमलबजावणीसाठी नियमांमध्ये आवश्यक बदल करणार असल्याचे मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. जिल्ह्यात दारुबंदीचा निर्णय झाला नसता, तर आपण मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास मागेपुढे पाहिले नसते असेही सांगितले.

गेली पाच वर्षे दारूपोटी हजारो संसार उध्वस्त झाले असून जवळपास एक लाख सह्यांची मोहीम महिलांनी राबवली होती. त्यासाठी महिलांनी मुंडन आंदोलन केले होते तसेच ६०० ग्रामपंचायतींनी दारूबंदीचा प्रस्ताव मंजूर केला होता. चंद्रपूर जिल्ह्यात जवळपास सातशे कोटी रुपयांची दारू दर वर्षाला रिचवली जात होती यावरून या निर्णयाची व्याप्ती व त्याचा महसूलावर होणारा परिणाम दिसून येतो.
शासनाचा निर्णय योग्य असून स्वागत व अभिनंदन करण्यासारखा असल्याचे मत अभय बंग व विकास आमटे यांनी केले आहे. तसेच या निर्णयाची अमलबजावणी कशी केली जाते हे बघणे महत्त्वाचे असल्याचे बंग व आमटे म्हणाले.