एन्काऊंटरमध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा, 2 जवान शहीद

0
13

श्रीनगर,दि.03(वृत्तसंस्था) – जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. गुरुवारीदेखील(2 नोव्हेंबर) दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातही दहशतवादी आणि भारतीय जवानांमध्ये चकमक झाली, या घटनेत एक जवान शहीद झाला. यानंतर काही तासांनी चकमकीदरम्यान एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले. याशिवाय सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारातही बीएसएफचा एक जवान शहीद झाला.

पोलीस महासंचालक एस.पी. वैद्य यांनी सांगितले की, जवानांनी संध्याकाळी पम्पोर परिसरातील संबूरा गावाला घेराव घालत शोधमोहीम सुरू केली. या परिसरात काही दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती, त्यानुसार ही शोधमोहीम सुरू करण्यात आली होती. शोधमोहीम सुरू असतानाच दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. जवानांनीदेखील दहशतवाद्यांच्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं आणि एका दहशतवाद्याला कंठस्नान घातलं.