पंतप्रधान मोदी आणि खासदार उदासीन

0
8

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशातील अनेक खासदारांनी स्वत:च्या मतदारसंघांमध्ये एक रुपयाही खर्च केलेला नसल्याची माहिती उघडकीस आली आहे. यात महाराष्ट्रातील खासदारही त्यांना मिळणारा खासदार निधी खर्च करण्यात उदासीन असल्याचे दिसून आले.
लोकसभा निवडणुकीला सुमारे आठ महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला. मात्र देशातील ३६ राज्यांमधील (केंद्रशासीत प्रदेश मिळून) अवघ्या १० खासदारांनीच आपल्या खासदार निधीतून विकास कामाला सुरुवात केली आहे. दिल्ली, उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, आसाम आणि हिमाचल प्रदेश अशा विविध राज्यांमधील खासदारांनी अद्याप खासदार निधीला हातही लावलेला नसल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे.
मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिसटिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन’ यांच्याकडून लोकप्रतिनिधींच्या विकासनिधीच्या प्रत्यक्ष वापराची माहिती मिळाली आहे. त्यानुसार, मे २०१४ ते १ जानेवारी २०१५ या कालावधीत देशातील ३६ राज्यांतील सर्व खासदारांना एकूण १२४२.५० कोटी रुपयांचा खासदार निधी देण्यात आला आहे. मात्र १० खासदारांनीच आपल्या खासदार निधीतून विकास कामाला सुरुवात केली आहे.
खासदारांना दरवर्षी ५ कोटी रुपयांचा खासदार निधी विकास कामांसाठी दिला जातो. या निधीतून खासदार त्यांच्या मतदारसंघातील गरजा पूर्ण करु शकतात. स्थानिक पातळीवरील आवश्यक कामांसाठी तत्काळ निधी उपलब्ध करून देता यावा यासाठी हा निधी असतो. या निधीतील पैसा पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, रस्ते यासाठी खर्च करण्याची खासदारांना सवलत दिलेली आहे.