बोंडअळीच्या मुद्द्यावर लक्ष्यवेधी पुढे ढकलल्याने विरोधक आक्रमक

0
2

नागपूर,दि.13- संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीवरून विरोधकांनी तिसर्‍या दिवशीही विधानभवनाच्या पायऱ्यांवर सरकार विरोधात घोषणाबाजी केली. ‘हे नव्हं माझं सरकार’ असे बॅनर हातात घेऊन विरोधकांनी पायऱ्यांवर बसून सरकारविरोधात आंदोलन केले. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेतेही यावेळी उपस्थित होते. राधाकृष्ण विखे पाटील, सुनील तटकरे हे नेतेही या घोषणाबाजीत सहभागी झाले होते.दरम्यान आजही विधानसभा व विधानपरिषदेचे कामकाज दिवसभरासाठी तहकुब करण्यात आले.

हिवाळी अधिवेशनाच्या तिसर्‍या दिवशीही शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी विरोधक एकवटले आहेत. कपाशीवरील बोंड आळीच्या मुद्द्यावर सरकार गंभीर दिसत नाही. लक्ष्यवेधी पुढे ढकलल्याने विरोधक आक्रमक चांगलेच आक्रमक झाले आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफीच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली आहे, असा आरोप विखे पाटील यांनी केला आहे.सरकार म्हणते, ऑक्टोबरमध्ये कर्जमाफी झाली. मात्र, अद्याप शेतकऱ्य़ांच्या बॅंक खात्यावर कर्जमाफीचे पैसे जमा झालेले नाहीत. सरकारने फक्त जाहिराती करुन जनतेची दिशाभूल करण्याचे काम केले आहे, असा आरोप अजित पवारांनी केला.दरम्यान, काल (मंगळवार) विरोधकांनी गोंधळ घातल्याने विधानसभेचे कामकाज अवघ्या तासाभरातच दिवसभरासाठी तहकूब झाले होते.