पानसरेंवर यशस्वी शस्त्रक्रिया, आणखी दोन शस्त्रक्रिया कराव्या लागणार, प्रकृती स्थिर पण गंभीर

0
17

कोल्हापूर – अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या गोविंद पानसरे यांची प्रकृती स्थिर पण गंभीर असल्याचे अॅस्टर आधार रुग्णालयातील डॉक्टरांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे. पानसरेंवर एक यशस्वी शस्त्रक्रिया झाली असून, आणखी दोन शस्त्रक्रिया सुरू आहेत. आणखी काही तास या शस्त्रक्रिया चालणार असल्याचेही डॉक्टरांनी स्पष्ट केल आहे.पानसरे यांच्या छातीबरोबरच पायाला गोळी लागली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र त्यांच्या मेंदुला रक्त पुरवणाऱ्या रक्तवाहिन्यांना काहीही इजा झाली नसल्याचेही डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. यासंदर्भात दुपारी चारनंतर पुढील माहिती देणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. तर त्यांच्या पत्नी उमा पानसरे यांच्या डोक्याला जखम झाली असून त्यांच्या मेंदूत रक्तस्राव झाला असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. मात्र त्यांची प्रकृती स्थिर असल्याचेही डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.
सकाळी सुमारे नऊ वाजता मोटारसायकलवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी गोविंद पानसरे यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यावेळी झटापटीत त्यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या पत्नी उमा पानसरे खाली पडल्या व त्यांच्या डोक्याला जबर दुखापतही झाली. दरम्यान हल्ल्याच्या निषेधार्थ कोल्हापुरात बाजारपेठा बंद करण्यास सुरुवात झाली आहे.
हल्ल्यावेळी कॉम्रेड पानसरे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी उमा होत्या. पानसरे यांना वाचवताना त्या खाली पडल्या व डोक्याला मार लागल्याने जखमी झाल्या. मात्र त्या धोक्याबाहेर आहेत. पानसरे यांच्या शरिरात एक गोळी असून, दुपारी एकच्या सुमारास पुढील माहिती दिली जाणार असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे.
कोल्हापूर येथील सागरमळा येथील घराजवळच पानसरे आणि त्यांच्या पत्नींवर हा हल्ला करण्यात आला आहे. मोटारसायकलसवर आलेल्या अज्ञात व्यक्तींनी हा हल्ला केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. कोल्हापुरात डाव्या चळवळीची सुरुवात करण्याचे श्रेय हे गोविंद पानसरे यांना जाते. पानसरे यांनी टोलविरोधी आंदोलनातही महत्त्वाची भूमिका निभावली आहे. त्याचबरोबर कामगार, मोलकरणी यांच्यासाठी गोविंद पानसरे यांनी अनेक लढे उभारले आहेत. त्याचबरोबर बालशिक्षणासाठीची चळवळही पानसरे यांनी चालवली आहे. नरेंद्र दाभोळकरांप्रमाणे त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा या हल्ल्यानंतर सुरू झाली आहे.