२१ फेब्रुवारी आता ‘मातृभाषा दिवस’

0
15

मुंबई – राज्यातील शाळा- महाविद्यालयांमध्ये २१ फेब्रुवारी रोजी ‘मातृभाषा दिवस’ साजरा करण्यात येणार आहे. भाषा विकास आणि भाषाविषयक विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रमांसोबत भाषा प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत, असे स्पष्ट आदेश केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय व विद्यापीठ अनुदान आयोगाने दिले आहेत.
युनोस्कोने १४ वर्षापूर्वी २१ फेब्रुवारी रोजी ‘आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस’ साजरा करण्यास सुरुवात केली. त्या पार्श्वभूमीवर शाळा-महाविद्यालयांत याच दिवशी ‘मातृभाषा दिवस’ साजरा करण्यात येणार आहे. मातृभाषेच्या विकासासोबत देशातील अन्य भाषांचाही सन्मान होण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा असून आपल्या देशातही साजरा करण्यात येत आहे.
यामुळे यूजीसीने दिलेल्या आदेशाप्रमाणे यंदा ‘मातृभाषा दिवस’ हा दिवस शाळा, महाविद्यालयांमध्ये मोठय़ा प्रमाणात साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रम, देशातील प्रमुख मातृभाषांविषयी स्पर्धा परीक्षा, प्रश्नोत्तरे, सामान्यज्ञान, व्याकरण आणि अनुवादासंदर्भातील विविध उपक्रम असे कार्यक्रम आयोजित करण्यात येतील.
राज्यातील सर्व कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयांसोबतच विद्यापीठ, महाविद्यालयांतील मराठी, हिंदी, गुजराती, कन्नड आदी भाषा विभागाकडून मातृभाषेतील शिक्षणाचे फायदे आदी विषयांवर परिसंवाद व्याख्याने ही आयोजित करून हा दिवस साजरा करण्यात यावा असेही युजीसीने आपल्या आदेशात म्हटले आहे.
महाविद्यालयांमध्ये साजरा करण्यात आलेल्या ‘मातृभाषा दिवस’ कार्यक्रमांची माहिती संबंधित विद्यापीठांसह युजीसीकडेही कळविणे आवश्यक असल्याचे युजीसीच्या आदेशात म्हटले आहे.
मातृभाषेच्या विकासासाठी कार्यक्रम
मातृभाषा दिवसाच्या निमित्ताने मातृभाषेचे महत्त्व अधोरेखित करणारे कार्यक्रम प्रामुख्याने शाळा-महाविद्यालयांमध्ये होतील. यात मातृभाषेविषयी पुस्तक प्रदर्शन मांडून भाषेच्या पुरातन काळातील इतिहासासोबत तिच्या उत्पत्ती, उगम विकासाची माहिती शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना देण्यात यावी, देशातील विविध भाषेतील वैविधता स्पष्ट करण्यासाठी त्यासंदर्भातील भाषाविषयक खेळ, आयोजित करून शालेय विद्यार्थ्यांसाठी वाचन, लेखन आणि संवाद कौशल्यावर आधारित कार्यक्रमही आयोजित करावेत असे आदेशही युजीसीने दिले आहेत.