सतीश शेट्टींच्या हत्येचा नव्याने तपास करणार सीबीआय

0
12

पुणे – सीबीआय नव्याने पुण्यातील आरटीआय कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्येचा तपास करणार असून सतीश शेट्टी यांची तळेगावात पाच वर्षांपूर्वी निर्घृण हत्या करण्यात आली होती. आठ महिन्यांपूर्वी या खुनाचा तपास शेट्टी यांचे मारेकरी सापडत नसल्याचे कारण देऊन सीबीआयने बंद केला होता.

सतीश शेट्टींच्या हत्येसंदर्भात काही पुरावे जानेवारी महिन्यात सीबीआयने घातलेल्या काही छाप्यात नव्याने मिळाल्याचे सीबीआयने स्पष्ट केल्यामुळे सीबीआय या हत्या प्रकरणाचा तपास नव्याने करणार आहे. सीबीआयने मावळ कोर्टात या खून प्रकरणाचा तपास अहवाल सादर करताना आरोपी सापडत नाहीत, असे सांगत तपास बंद करत असल्याचे स्पष्ट केले होतं. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानेच सतीश शेट्टी यांनी आरआयबीचे वीरेंद्र म्हैसकर यांच्या विरोधात केलेल्या तक्रारीचा फेरतपास करण्याची परवानगी मिळाली होती.

या हत्या प्रकरणाचा तपास करताना अनेक कच्चे दुवे साधले जात नव्हते. नेमक्या याच दुव्यांची माहिती सीबीआयला एका बिल्डरच्या घरावर तसेच कार्यालयावर छापे घालताना मिळाले, असे सीबीआयकडून स्पष्ट करण्यात आले आहे. नोव्हेंबरमध्ये दाखल करण्यात आलेल्या एका वेगळ्या गुन्ह्याबाबत जानेवारी महिन्यात सीबीआयने हे छापे घातले होते.