बस-आॅटो अपघातात २४ महिला जखमी

0
10

जांब(लोहारा) : मजूर वाहून नेणारा आॅटो व एसटी बसमध्ये झालेल्या अपघातात २४ महिला व एक पुरूष जखमी झाले. यातील १५ जखमींवर भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहे. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. ही घटना शनिवारी सकाळी १०.०५ वाजताच्या सुमारास लंजेरा ते पिटेसूर वळणावर घडली.

रोंघा येथील महिला मजूर सोरणा येथे टमाटर तोडण्यासाठी आॅटो एमएच १७ के ७७०० ने येत होते. आॅटोत २४ महिला मजूर होत्या. तर भंडाराकडून रोंघाकडे एसटी बस एमएच ४०- ८८४४ जात होती. बसमध्ये जवळपास १० ते १२ प्रवासी होते. लंजेरा ते पिटेसूर वळणावर आॅटो व बसमध्ये धडक झाली. यात बसमधील व आॅटोतील महिला जखमी झाल्या. जखमींनी आरडाओरड केली. अपघाताची माहिती कळताच नागरीकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. पोलीसांना कळविण्यात आले. आंधळगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठले. पोलीस, ग्रामस्थ व जिल्हा परिषद सभापती संदीप ताले यांच्या सहकार्याने जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्र जांब येथे दाखल करण्यात आले. यातील १५ जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु असून प्रकृती धोक्याबाहेर आहे. प्रकरणाची नोंद आंधळगाव पोलिसांनी केली असून तपास सुरु आहे.