सीबीआय पथक तुमसर तालुक्यात

0
6

तुमसर : नागझिरा अभयारण्यातील ‘राष्ट्रपती’सह अन्य वाघांच्या शिकारप्रकरणी म्होरक्या कुट्ट पारधी (३0) याच्या कबूलीनंतर सीबीआयचे पथक नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रातील पांगळी जंगल शिवार तथा लेंडेझरी वनपरिक्षेत्रात दाखल झाले. यावेळी बावनथडी मुख्य कालव्याला भेट देऊन निरीक्षण केले.
सीबीआय पथक कुट्टसह तीन दिवसापूर्वी भंडारा जिल्ह्यात दाखल झाले होते. हे पथक सायंकाळच्या सुमारास नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रातील पांगळी जंगलात दाखल झाले. पुढे लेंडेझरी वनपरिक्षेत्रातून बावनथडी प्रकल्पाच्या कालव्याच्या रस्त्यावरून तीन ते चार कि.मी. पायी चालत गेले. स्थानिक वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी सुद्धा त्यांच्या सोबत होते. दोन तासानंतर हे पथक नागपूरकडे रवाना झाले. रविवारी सकाळी १0 च्या सुमारास नागझिराचे (गोंदिया) वनसंरक्षक ठवरे हे नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रात दाखल झाले. सीबीआयच्या पथकाने त्यांच्यावर पुढील तपासाची जबाबदारी सोपविल्याची माहिती आहे. लेंडेझरी वनपरिक्षेत्रात पूर्वी वाघांची संख्या मोठी होती. ती येथे झपाट्याने कमी होत गेली.नाकाडोंगरी वनपरिक्षेत्र व लेंडेझरी वनपरिक्षेत्राच्या सीमा मध्यप्रदेशाला भिडल्या आहेत. नदीपलीकडे मध्यप्रदेशाची सीमा सुरु होते. सीबीआय व मेळघाट वाईल्ड लाईफ क्राईम सेलच्या पथकाने कुट्ट छेलाल पारधी (३0) रा.गिरोली ता.रेडी जि. कटनी येथून अटक केली. तुमसर तालुक्याच्या सीमेचा अभ्यास या पथकाने केल्यावर गिरोलीचे अंतर कमी आहे. त्यामुळे या पथकाने नाकाडोंगरी व लेंडेझरी जंगलावर लक्ष केंद्रीत केले आहे. त्याचाच भाग म्हणून वनसंरक्षक ठवरे यांना तुमसरात पाठविण्यात आले अशी माहिती आहे.